1 एप्रिलला होणार चाचणी
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड, राजपुरी येथील समुद्रात ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याजवळ प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी जेट्टीचे काम गतवर्षी सुरू झाले. हे काम प्रगतीपथावर होते. मात्र वादळामुळे ते बंद करण्यात आले होते. परंतु पावसानंतर जेट्टीजवळ कोणतेही काम सुरू होत नसल्याने ये-जा करणार्या पर्यटकांनी नाराजी दर्शवली होती. आता सहा महिन्यांनी या जेट्टीच्या कामाला मुहूर्त मिळाल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले आहे.
ऐतिहासिक जंजिरा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने तो पाहण्यासाठी शिडाच्या बोटीतून पर्यटकांना ने-आण केली जाते. प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने बोटीतून उतरताना मोठी कसरत करावी लागते. काही पर्यटक तर उतरताना गंभीर जखमी झाले आहेत. यांची दखल घेत शासनाने सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेट्टी बनवण्यासाठी प्रस्ताव केला. यासाठी 93 कोटी 56 लाख रुपयांच्या निधीला पुरातत्व विभागाने मंजुरी दिली होती.
हे काम प्रगतीपथावर असताना गेले सहा महिने ते थांबल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.आता पुन्हा या जेट्टीच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम 31 मार्चपर्यंत पुर्ण होणार असून 1 एप्रिल 2025 ला चाचणीसाठी जेट्टी खुली होणार असल्याने पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
किल्ल्याजवळील जेट्टीच्या ठिकाणचे काम पावसात बंद होते. पावसानंतर किल्ल्याजवळील जेट्टीवर काम सुरू नसले तरी त्या संदर्भातले कास्टींगचे काम दिघीजवळील पेट्रोल पंपाजवळ सुरू आहे. आता हे काम पूर्ण झाल्याने जेट्टीच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम 31 मार्च पूर्वी होणार आहे. 1 एप्रिलपासून शिडाच्या होड्या व इंजिन बोटींची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर ही जेट्टी प्रवाशांसाठी सुरू केली होईल.
दिपक पवार,
उपअभियंता, मेरीटाईम बोर्ड मुंबई