| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मनंद नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या शोधमोहिमेत सात बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. यापूर्वीदेखील शिरवणे गावातील विशेष शोध मोहिमेत तीन बांगलादेशी नागरिकांना नेरुळ पोलिसांनी अटक केली होती.
नेरुळ विभागातील प्रशांत कॉर्नरच्या पाठीमागे कुकशेत, सेक्टर 14 येथे सी रिजन्सी या विकासकाची बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरील संबंधित लेबर ठेकेदाराने आपल्या कामावर काही बांगलादेशी कामगार कामावर ठेवले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्याचे वपोनि ब्रह्मनंद नाईकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे आणि पोलीस पथकाने बुधवारी सापळा रचून सदर बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या कामगारांची तपासणी केला असता सात बांगलादेशी पुरुष आढळून आले. नेरुळ पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी शिरवणे गावात केलेल्या एका शोध तपासणी मोहिमेत तीन बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंटची कामे सुरु आहेत. त्यामुळे इथं कामगारांची मोठी मागणी आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या शोधमोहिमेत 47 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती, असे सूत्रांनी सांगितले.