सात वर्षांच्या चिमुकलीची 121 व्या गडाला गवसणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला जातो. सह्याद्री डोंगररांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या गडाच्या पायथ्याशी जाणारी वाटदेखील थरारक आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत 16 गिर्यारोहकांचादेखील समावेश होता.
कठीण गडांच्या मोहिमेसाठी राजे शिवाजी वॉल क्लाइंबिंग, पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल जोगदंड आणि मांतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षांपासून शर्विका सातत्याने प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली तसेच एसएल अॅडव्हेंचर, पुणे या संस्थेच्या माध्यमातून एवरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते. याच संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.