वाहनाच्या धडकेत झाले होते जखमी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ माथेरान घाट रस्त्यात 29 जानेवारी रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन माकडे जखमी झाली होती. मादी जातीचे माकड आपल्या पिल्लाला तेथेच टाकून जंगलात गेल्याने जखमी झालेले आठ दिवसांच्या पिल्लाला एका प्राणीमित्र तरुणाने नेरळ वन कार्यालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी वन कर्मचार्याने माकडाच्या लहान पिल्लावर उपचार न करता तसेच पाठवून दिल्याने रात्री ते माकडाचे पिल्लू मरण पावले. दरम्यान, त्या प्राणीमित्र तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने माकडाच्या पिल्लाचे अंतिम संस्कार केले असून, वन विभागाच्या भूमिकेबद्दल टॅक्सी चालक मालक संघटनेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जूम्मा पट्टी येथे घाटरस्त्यावर एक माकड आणि तिचे लहान पिल्लू रस्त्यावर विव्हळत असल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथून जाणारा टॅक्सी चालक यांच्या प्राणीमित्र असलेला मुलगा ते पिल्लू उचलण्यासाठी गेला असता त्या पिल्लाची आई असलेले मादी माकड लंगलात जंगलात पळून गेले. शेवटी त्या प्राणीमित्र तरुणाने त्या आठ दिवसांच्या लहान पिल्लाला उचलून नेरळ येथे आणले. नेरळ गावात येत असताना माथेरान नाका येथे असलेल्या हुतात्मा चौकात नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी त्या टॅक्सी चालकाचे मुलाकडे असलेल्या माकडाबद्दल चौकशी केली. त्यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या माकडाच्या पिल्लाला उपचार व्हावेत म्हणून त्या सर्वांनी नेरळ खांडा येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयात नेले. या वन विभागाच्या कार्यालयाच्या मागे पशुवैद्यकीय दवाखाना आहे.
सदर पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने वन कर्मचारी यांनी त्या माकडाच्या पिल्लावर कोणत्याही प्रकारचे उपचार करण्यात आलेले नाहीत. त्या ठिकाणी असलेले वन कर्मचारी यांनी प्राणीमित्र तरुणाला सूचना करताना ज्या ठिकाणावरून ते माकडाचे पिल्लू उचलले आहे, तेथेच पुन्हा ठेवून देण्याची सूचना केली. त्यामुळे रात्रीच्या अंधारात हा प्राणीमित्र तरुण आपल्या मित्रांसह पुन्हा माथेरान घाटात गेला. ज्या ठिकाणी वाहनाच्या धडकेत ते माकडाचे पिल्लू आढळले होते तेथे जखमी माकडाच्या पिल्लू यास घेऊन गेले. अपघात स्थळी लहान पिल्लू अर्धा तास त्या मादी माकड आपल्या पिल्लाजवळ येते काय? याची वाट पाहिली. मात्र, त्या लहान पिल्लाची आई न आल्याने प्राणीमित्र तरुणाने त्याबाबत वन विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, त्या वन कर्मचार्याने त्या माकडाच्या पिल्लाची जबाबदारी न घेता तुम्हीच ते पिल्लू घरी घेऊन जा आणि सकाळी जंगलात सोडा, असा सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकली.
शेवटी प्राणीमित्र असलेल्या त्या तरुणाने ते आठ दिवसांचे माकडाचे पिल्लू आपल्या घरी नेले. तेथे त्या माकडाच्या पिल्लू यास दूध पाजून घरात ठेवले. मात्र, रात्री ते पिल्लू मरण पावले असून, वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्या पिल्लाचे प्राण गेले असल्याची भावना निर्माण झाली आहे. माकडाच्या आठ दिवसांच्या पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर प्राणीमित्र तरुण आणि टॅक्सी चालक रवींद्र मिसाळ यांनी त्या मृत पिल्लाला जंगलात नेले आणि खड्डा खोदून दफन करून अंत्यसंस्कार केले.
वन विभागाच्या कर्मचार्यांनी तत्परता दाखवली असती आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून उपचार केले असते, तर आणखी वेगळे चित्र दिसले असते. त्यामुळे ते जखमी माकडाचे पिल्लू वाचले असते.
रवींद्र मिसाळ,
टॅक्सी चालक
अशा प्रकारचे पिल्लू त्याच्या आईपासून विलग झाले तर त्यांचे मनोमिलन घडवावे लागते. त्यासाठी आम्ही त्या पिल्लाला प्राथमिक उपचार करून सकाळी प्राण्यांच्या अधिवासात पाठवण्याची सूचना केली होती. मात्र, दूध देण्यात आल्यानंतर काही उलटी क्रिया झाली आणि त्यामुळे त्या पिल्लाचा मृत्यू झाला असावा.
उमेश जंगम,
वन क्षेत्रपाल, नेरळ माथेरान