| दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर हरियाणा अंबाला येथे भीषण अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकची धडक झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. 24) सकाळी हा भीषण अपघात झाला असून अपघातातील मिनी बस हरियाणाहून अंबाला मार्गे वैष्णो देवी मंदिराकडे चालली होती. बसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते. बस दिल्ली-जम्मू हायवेवर असताना बसच्या पुढे एक ट्रक होता. ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे मिनी बस ट्रकला मागून जोरात धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात मिनी बसच पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच, जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचचा ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चालवत होता. सध्या ड्रायव्हर फरार आहे.