एनडीआरएफकडून चार जणांचा शोध सुरु
| महाड | प्रतिनिधी |
अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये 11 बेपत्ता कामगारांपैकी 7 जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या अन्य चार जणांचा शोध घेण्यात येत आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
दरम्यान, रात्रीपासून कंपनीच्या गेट बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप आणि आक्रोश व्यक्त केला. कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्लू जेट या कंपनीमध्ये 3 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले होते. तर अकरा कामगार दगावल्याची भीती व्यक्त केली जात होती. संपूर्ण कंपनीचे स्ट्रक्चरच आगीमध्ये जळून गेल्याने येथील कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांचे मदत कार्य सुरू होते.
आगीत सर्वच जळून खाक झाल्याने पुढे जात असताना एनडीआरएफच्या जवानांना खुपच अडचणी आल्या. शनिवारी पहाटे पाचनंतर सात मृतदेह त्यांच्या हाती लागले. या अपघातामध्ये महाड तालुक्यातील तळीये, चोचींदे खरवली व पडवी या ठिकाणचे स्थानिक कामगार दगावले आहेत. याशिवाय काही राज्यातील व परप्रांतातील कामगारांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, कपंनीला उत्पादनाची परवानगी नव्हती, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे, असे घार्गे यांनी सांगितले.
मृतदेह पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात येऊन तेथे मृतदेहांचे शवविच्छेदन आणि डिएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात येणार आहेत, असे महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापूरकर यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, प्रातांधिकारी ज्ञानोबा बानापुरकर, अतिरीक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.