| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यतील दुर्गम भागातील गुडवणवाडी मध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर शासनाने सुरु केले आहेत. मात्र या वाडीची मोठी वस्ती लक्षात घेऊन येथील आदिवासी लोकांना स्थानिक भागातील फार्म हाऊसकडे असलेल्या पाण्याच्या टाक्यामधील पाणी तेथे जाऊन आणावे लागत आहे.
तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत मधील गुडवनवाडी मध्ये तेथील नळपाणी योजनेचे कधीही पाणी पोहचले नाही. सुगवे गवे तसेच सात आदिवासी वाड्यांसाठी महाराष्ट्र शासनाने 1998 मध्ये नळपाणी योजना राबविली होती. त्यावेळी अडीच कोटी खर्चाची ती योजना अद्याप पर्यंत 100 टक्के पूर्ण झालेली नाही. त्या योजनेचे पाणी सर्व भागात पोहचले नाही तसे गुडवण वाडी या एका डोंगरावर असलेल्या वाडी पर्यंत पोहचले नाही. योजनेचे पाणी वाडी पर्यंत पोहचावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून वाडीच्या पायथ्याशी वीज पंप देखील उभारण्यात आला. मात्र नळाला पाणी काही पोहचले नाही. शेवटी पूर्वीपासून पाणीटंचाई ग्रस्त असलेली गुडवणवाडी नंतरच्या काळात देखील पाणी टंचाईग्रस्त राहिली आहे. या वाडी मधील लोकसंक्खा हि 100 हुन अधिक घरांची वस्ती असल्याने जास्त आहे. त्यामुळे मार्च महिना सुरु झाला कि त्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागते आणि त्यानंतर येथील आदिवासी लोक पिण्याचे पाणी आणण्यासाठी परिसरात वणवण भटकत असतात.
मागील आठवड्यात गुडवण वाडी मध्ये शासनाचा ट्रॅकर सुरु झाला आहे, मात्र या वाडीची लोकसंख्या लक्षात घेता दररोज येणार ट्रॅकर मधील पाणी देखील स्थानिकांना पुरेसे नसते. त्यामुळे या वाडी मधील आदिवासी महिला या पिण्याचे पाणी घरी आणण्यासाठी परिसरात भटकंती करीत असतात. शासकीय ट्रॅकर आला तरी पिण्याच्या पाण्याची समस्या काही सुटलेली नाही आणि त्यामुळे गुडवणवाडी मधील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.