किहिममध्ये ऐन पावसात भीषण पाणीटंचाई

| सोगांव | वार्ताहर |

मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या व अलिबाग तालुक्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी प्रमुख पसंती असलेल्या किहीम ग्रामपंचायत हद्दीत उन्हाळ्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र किहीम ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असला, तरी सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पिंट्या गायकवाड यांनी नागरिकांना स्वखर्चाने मोफत पाणीपुरवठा करीत दिलासा देत आहेत.

किहीम ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील साईनगर, विश्वनगर, चोंढी आदिवासीवाडी व इतर भागात उन्हाळ्यापासून भीषण पाणीटंचाई सुरू असून, आता तर भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. किहीम ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक पहात आहेत. त्यामुळे कोणी पाणी देता का पाणी, असे म्हणण्याची पाळी स्थानिकांवर आली आहे.

एकिकडे केंद्र व राज्य सरकार ‘हर घर नळकनेक्शन’ची घोषणा करीत असताना दुसरीकडे किहीम परिसरातील नागरिक मात्र उन्हाळ्यापासून पाण्याविना वंचित असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. या नागरिकांच्या पाणी समस्येकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नसल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि किहीमचे माजी सदस्य पिंट्या गायकवाड यांनी उन्हाळ्यापासून या नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा सुरु केल्याने स्थानिक नागरिकांना दिलास मिळाला आहे. तर किहीम ग्रामपंचायतीचे प्रशासकांना कधी जाग येणार, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version