| सोगाव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सातिर्जे, बोंबटकरपाडा, कातळपाडा आदी गावांकडे जाणार्या अंतर्गत रस्त्यावर असलेला पूल हा शेवटची घटका मोजत आहे. त्याबाबत किहीमचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शासनाने याची दखल घेऊन याठिकाणी लवकरात लवकर नवीन पूल उभारावा, अशी मागणी केली आहे.
सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की, किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सातिर्जे गावाकडे जाणार्या किहीम व सातिर्जे ग्रामपंचायतीला जोडणारा हा पूल खूप वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा पूल आज जीर्ण अवस्थेत आला आहे. या पुलाचे प्लास्टर गळून पडत आहे. त्यामुळे पुलाच्या जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर पडून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या पुलावरून सातिर्जे, बोंबटकरपाडा, कातळपाडा आदी गावांतील शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, अवजड वाहने इत्यादी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. पावसाळ्यात समुद्राच्या भरतीवेळी मोठा पाऊस पडल्यावर या पुलावरून पाणी जाते. त्यासाठी शासनाने याकडे लक्ष देऊन हा पूल त्वरित नवीन व जास्त उंचीचा बनवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.