आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
| कोर्लई | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील करंजाडे -मुखरीचीवाडीत पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेला आदिवासी बांधव अद्यापही घरकुल योजनेपासून वंचित असून, समाजावर होणार्या अन्यायाबाबत आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद यांनी आपल्या सहकार्यांसमवेत अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील करंजाडे-मुखरीचीवाडी करंजाडे सेक्टर 3 येथे आदिवासी समाज पिढ्यान्पिढ्यांपासून वास्तव्यास असून, सदर जागेवर या समाजाची राहती घरे कुडा मातीची आहेत. लहान मुले, वृद्ध या घरात अतिशय भीतीयुक्त वातावरणात राहात आहेत. या भागामध्ये ग्रामपंचायत करंजाडे घरकुल योजना राबवण्यास टाळाटाळ करत असल्याने परिणामी या वाडीतील आदिवासी बांधवांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मानवधिकाराचा विचार करुन करंजाडे- मुखरीची वाडी सेक्टर 3 येथील अदिवासींना न्याय मिळवून द्यावा व त्याच ठिकाणी त्यांचा विकास व पुनर्वसन करण्यात यावे, असे आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार अॅड. के.डी. पाटील, अॅड. विक्रांत पाटील, मार्गदर्शक डॉ. संदीप वारगे, गणेश कातकरी, दिलीप कातकरी, मंगेश महाजन, ओमकार पेडणेकर, सविता कातकरी, कमला वाघे, गौरी वाघे, आशा कातकरी, गिरीजा वाघे, संगीता वाघे, आशा वाघे, वनिता मुकणे, सिद्धेश पाटील उपस्थित होते.