| उरण | प्रतिनिधी |
वनविभाग व महसूल विभाग यांच्या कृपाशीर्वादाने डोंगर भागात सतत होणारे मुरुम, मातीबरोबर दगडाचे उत्खनन, वणवे यामुळे वन्यप्राणी हे सैरभैर झाले आहेत. त्यात चिरनेर गावातील आकाश गोंधळी या शेतकर्याला आपल्या शेतजमिनीजवळ दुर्मिळ झालेल्या रानगवाचे दर्शन झाले असून, सध्या शेतकरी भयभीत स्थितीत वावरताना दिसत आहेत.
दरम्यान, अन्नपाण्याच्या शोधार्थ वानरांच्या आठ-दहा कळपांनी आपला ठिय्या हा रहिवाशांच्या घराच्या छपरावर वळवून घरांच्या छपराची नासधूस करण्यास सुरुवात केल्याने रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. तरी वन विभागाच्या अधिकार्यांनी रानगव्याबरोबर गावात हैदोस घालणार्या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, रहिवासी व्यक्त करत आहेत.