| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग- 66 वरील माणगाव पासून एक किलोमीटर अंतरावर महाड बाजुकडून दहिसरकडे स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणाऱ्या ट्रकला सोमवारी (दि.05) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दल व स्थानिकांना तब्बल साडेपाच तास लागले.
महाड वरून दहिसरला स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणारा ट्रक माणगाव ते इंदापूरच्या दरम्यान माणगावपासून एक किलोमीटरच्या अंतरावर असताना ट्रकमधील असलेल्या साहित्याला अचानकपणे आग लागली. ट्रक चालकाच्या हे लक्षात येताच त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला व तेथील स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दलाला व पोलीस प्रशासन यांना संपर्क साधला.
माणगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली परंतु, ट्रकमध्ये साहित्य ज्वलनशील असल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण होत होते. तसेच आग अतिशय भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. त्यासोबतच धाटाव अग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेबारा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ते सकाळी पहाटे पावणे सहाच्या दरम्यान आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. आग विझवण्यासाठी जवळपास 50 हजार लिटर इतके पाणी वापरण्यात आले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे व मालाचे मोठे नुकसान झाले.