| खोपोली | वार्ताहर |
सारसन गावच्या हाद्दीतून जाणार्या द्रुतगती मार्गाच्या बाजूच्या फुडमॉल हाटेलसह इतर हॉटेल, पेट्रोल पंपातील सांडपाणी रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत पातळगंगा नदीत सोडले जात आहे. यामुळे नदी दूषित झाली आहे.
रविवारी (दि.23) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेलचे सांडपाणी सोडत असल्याचे पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, खालापूर तहसिलदार आयुब तांबोली, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्याशी संपर्क करून हकीकत कळविली.
पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आवाज उठविला जात असताना व्यवस्थापक रात्रीच्यावेळी सांडपाणी नदीत सोडत आहेत. घनकचरा, टाकाऊ अन्न पदार्थ, प्लास्टिक कचरा जमा करणार्या ठेकेदारांकडे प्रदुषण मंडळाची परवानगी नसल्यामुळे छुप्या पद्धतीने नदीकाठी कचरा जाळत आहेत. तर फुडलमॉल, हॉटेल प्रदूषणाचा दावा हरित लवादाकडे चालू असूनसुद्धा हॉटेल चालक सांडपाणी नदीत सोडत आहेत. खालापूर टोलनाका शेजारी फुडमॉल व हॉटेल्स यांचे दुर्गधीयुक्त सांडपाणी यावर कोणतीही प्रक्रिया न करता सदर सांडपाणी पाताळगंगा नदी उपपात्रात राजरोषपणे सोडले जात आहे. ते सदर पाणी सारसन गावाच्या हद्दीत पाताळगंगा नदीत जाते व त्यामुळे पाताळगंगा नदी प्रदूषित होत आहे.
सदर फूडमॉल मालक शासकीय निर्देशांचे पालन न करता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रात्री सांडपाणी पाताळगंगा नदीमध्ये सोडत आहे सदर फुडबॉल यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू.
अरूण जाधव, अध्यक्ष, पातळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट