भरावामुळे इमारतीत शिरले सांडपाणी

रहिवाशांना घराबाहेर पडणे मुश्किल
। रसायनी । वार्ताहर ।
इमारतीच्या शेजारी भराव केल्यामुळे इमारतीच्या रहिवासियांचे सांडपाणी व आसपासच्या परिसरातील सांडपाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये साठल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. चौक शहरात वाढत्या शहरीकरण व नियोजनशून्यतेमुळे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने पाणी इमारतीच्या खालीच पार्किंगमध्ये साठून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहेच; पण इमारतीच्या बाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. इमारतीच्या खाली सांडपाण्यात सिमेंट ब्लॉक ठेवून जाणे येण्याची वाट करण्यात आली आहे. आता तर उन्हाळा आहे, पावसात काय अवस्था होईल, हे सांगणे कठीण आहे, असे इमारतीचे मालक विनायक देशमुख यांनी सांगितले.
याबाबत आपण महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी रायगड, ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार करणार असून, केलेला माती भराव अधिकृत की बिना स्वामित्व याने केलेल्याबाबत महसूल विभागदेखील अनभिज्ञ आहे, असेच विनायक देशमुख यांनी सांगितले. होत असलेल्या इमारती अनधिकृत बांधकाम असून, कुठल्याही सक्षम संस्था यांची परवानगी घेतली नाही, केवळ ग्रामपंचायत यांच्या नाहरकत दाखल्यावर इमारत उभी राहात असेल तर होणार्‍या धोक्यापासून ग्रामपंचायत संरक्षण करेल का? अशी विचारणा होत आहे.

Exit mobile version