चिरनेरच्या मुख्य रस्त्यांवर गटारगंगा

प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट


| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मागील 15 दिवसांपासून गटारगंगा वाहत असून, येथील ग्रामस्थांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध महिला आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामध्ये चिरनेर गावातील कातळपाडा, राजाराम केणी ते किशोर परदेशी यांच्या घरासमोर, जुने एसटी स्टँड पासून कातळपाडा मार्गाकडे, तर जुने एसटी स्टँडपासून राम मंदिरापर्यंत चिरनेर गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गटारांचे पाणी वाहत आहे. चिरनेर येथील ग्रामस्थ व महिलांनी गटारांच्या पाण्याचा बंदोबस्त करावा याबाबत ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्या निर्दशनास आणून देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.

मागील फेब्रुवारी 2023 पासून प्रशासक बसलेल्या चिरनेर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी होत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने गटाराच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या गंभीर समस्येकडे चिरनेरमधील कोणताही राजकीय पुढारी धजावत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी थातूरमातुर उत्तरे देऊन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असून, नव्याने येणाऱ्या सरपंच आणि सदस्यांकडून ही कामे केली जाणार असल्याच्या गमजा मारत असल्याचे बोलले जात आहे.

चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील तुंबलेल्या गटारांचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्याचा त्रास गावातील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. सदरची तुंबलेली गटारे तात्पुरत्या स्वरूपात मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांसमवेत चार-पाच मजूर कामाला लावून ते काम करण्यात येईल.

एम.जी. पवार, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत-चिरनेर
Exit mobile version