| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील पेठगाव परिसरात राहणार्या 22 वर्षीय तरुणाने त्याच परिसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सदर तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली अटक केली आहे.
न्यायालयाने या तरुणाची 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील अटक आरोपी पनवेलमधील पेठगाव परिसरात राहण्यास असून, तो डिलीव्हरी बॉयचे काम करतो. तर 16 वर्षीय पीडित मुलगीदेखील त्याच परिसरात राहण्यास असून, सध्या ती शिक्षण घेत आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडित मुलीसोबत ओळख वाढवून मैत्री केली होती. त्यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये दुपारच्या सुमारास तिला मैत्रिणीशी भेट घालून देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यानंतर याने सदर मुलीला आपल्या मित्राच्या घरामध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी त्याने पीडित मुलीने आरडाओरड केल्यास अथवा सदर प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास तिच्या भावाला आणि आईला मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने घाबरुन तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती कुणालाही दिली नाही. मात्र, गत आठवड्यात पीडित मुलीने सदर प्रकाराची माहिती आपल्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी याच्याविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.