| पनवेल | वार्ताहर |
खारघर भागात राहणार्या तरुणाने त्याच भागातील अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करुन जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर या तरुणाने तिला मारहाण करुन व्हॉट्सअॅपवरुन तिला मेसेज पाठवून भररस्त्यात प्रेग्नेंट करण्याची धमकी दिली. अक्षत सोनावणे (20) असे या तरुणाचे नाव असून, खारघर पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह विनयभंग तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी अक्षत सोनावणे आणि पीडित तरुणी दोघेही खारघरमध्ये राहण्यास आहेत. 2020 मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असताना अक्षतने तिच्यासोबत मैत्री केली होती. त्यानंतर त्याने तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी सदर मुलीने त्याला नकार दिल्यानंतरदेखील आरोपी अक्षत याने तिच्यासोबत दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मात्र, त्यानंतरदेखील तिने त्याच्यासोबत कायम शरीरसंबंध ठेवावेत यासाठी आरोपी अक्षतने तिच्या पाठीमागे तगादा लावला होता. मात्र, पीडितेने नकार दिल्यानंतर अक्षतने तिला मारहाण केली. तसेच तिला व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवून भररस्त्यात प्रेग्नेंट करण्याची धमकी दिली. अक्षतकडून अशा पद्धतीने वारंवार त्रास देण्यात येत असल्याने अखेर पीडित मुलीने खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अक्षतला अटक केली आहे.