| पनवेल | वार्ताहर |
ठाण्यात राहणार्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील पाच वर्षे लैंगिक अत्याचार करुन परस्पर दुसर्याच तरुणीसोबत लग्न करुन पीडित तरुणीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील 26 वर्षीय पीडित तरुणी आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी निलेश डोके (29) दोघेही ठाण्यात राहण्यास आहेत. निलेशने 2020 मध्ये पीडित तरुणीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून सदर तरुणीला पनवेलच्या सुकापूर येथील मरीआई हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरदेखील निलेश डोके याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मागील पाच वर्षे आरोपी निलेशने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने दुसर्याच तरुणीसोबत लग्न केले. सदर बाब पीडितेला समजल्यानंतर तिने खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निलेश डोके याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.