41 वर्षीय आरोपी अटकेत
। पनवेल । प्रतिनिधी ।
उलवे परिसरात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर 41 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी उलवे पोलिसांनी दिपचंद रामदत्त कांडपाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिपचंद कांडपाल हा मूळचा उत्तराखंड येथील असून कामानिमित्त सध्या उलवे परिसरातील एका चाळीत वास्तव्यास होता. त्याने त्याच चाळीतील एका खोलीत राहणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित बालिकेने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी तातडीने उलवे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेसोबत घडलेल्या या घटनेमुळे उलवे परिसरात संताप व्यक्त होत असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
