। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल भागात राहणार्या एका 11 वर्षीय मुलाने तो राहत असलेल्या इमारतीतील 8 वर्षीय मुलावर तसेच 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या 11 वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
या घटनेतील 11 वर्षीय अल्पवयीन मुलगा तसेच 8 वर्षीय पीडित मुलगा व 3 वर्षीय पीडित मुलगी हे तिघेही पनवेलमध्ये एकाच इमारतीत राहण्यास आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकांसोबत चांगली ओळख असल्यामुळे तिघेही नियमित एकत्र खेळत होते. या अल्पवयीन मुलाने पीडित मुलगा व मुलगी या दोघांना खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या जिन्याखाली नेऊन त्यांच्यासोबत अश्लील व लैंगिक चाळे केले. त्यानंतर या अल्पवयीन मुलाने दोन्ही पिडीतांवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर घाबरलेल्या दोन्ही पीडित मुलांनी घडल्या प्रकारची माहिती आपल्या आई-वडिलांना दिल्यानंतर त्यांनी आपापल्या मुलांसह पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेतील पीडित मुलांच्या चौकशीत सदर अल्पवयीन मुलगा हा दोन्ही पीडितांना गत सप्टेंबर महिन्यापासून खेळण्याच्या बहाण्याने तसेच चॉकलेट देण्याच्या बहाण्याने इमारतीच्या जिन्याखाली त्यांना नेऊन त्यांच्यासोबत अश्लील व लैंगिक चाळे करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या अल्पवयीन मुलासविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
