सेझ प्रकल्पग्रस्त एकवटले; आ. जयंत पाटील उद्या खारेपाटात

वाशी येथे शेतकरी सभा

| पेण | प्रतिनिधी |

महामुंबई सेझ प्रकल्पासाठी पंधरा वर्षापूर्वी संपादित केलेल्या जमिनी प्रकल्प उभा न राहिल्याने परत कराव्यात या मागणीसाठी पेण तालुक्यातील सेझ प्रकल्पग्रस्त शेतकरी एकटवटले आहे. या शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील हे रविवारी (दि.12) पेण तालुक्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते खारेपाटामधील शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आ.जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन सरकारला धारेवर धरले होते. यावरही या बैठकीत उहापोह केला जाणार आहे.

आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी, ता.पेण येथे दुपारी साडेतीन वाजता शेतकर्‍यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. सेझबाधित शेतकर्‍यांच्या जमिनी पूर्ववत परत मिळवण्यासाठीची पुढील रणनिती ठरविण्याबरोबरच सेझबाधित शेतकर्‍यांशी ते संवाद साधणार आहेत.

या सभेमध्ये विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सेझ संदर्भात मंत्र्यांनी दिलेले उत्तर आणि भविष्यात सातबारा कसा कोरा करता येईल या संदर्भात विचार विनिमय होणार आहे. 2006 साली पेण तालुक्यातील 24 गाव सेझ बांधित झाली होती. परंतु, त्यावेळी देखील शेतकरी कामगार पक्षाने शेतकर्‍यांची बाजू न्यायालयात, रस्त्यावर व विधीमंडळात लावून धरून सेझला पेण येथून हद्दपार केला. परंतु, आजही सातबार्‍यांवर सेझची नोंद आहे. नियमानुसार एखाद्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेवर तो प्रकल्प 15 वर्षाच्या आत उभा राहिला नाही तर, संपादित केलेली जागा शेतकर्‍यांना परत करायची असते त्याच नियमानुसार पेण, उरण, पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांचे सातबारे कोरे व्हावेत यासाठी आ.जयंत पाटील यांनी आत्ताच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सेझ संपादित जमिनी संदर्भात सरकारला उत्तर द्यावे लागले आहे.

या सर्व बाबींची माहिती शेतकर्‍यांना मिळावी म्हणूनच दादर येथे सभेचे आयोजन केले आहे. तरी सर्व सेझ बाधित शेतकर्‍यांनी या सभेसाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे. या बैठकीनंतर खारेपाटातून जात असलेल्या गेल पाईपलाईन व विरार ते अलिबाग या कॉरिडॉरबाबत देखील चर्चा होणार आहे. तरी गेल कंपनी बाबत व कॉरिडॉर संबंधित शेतकर्‍यांनी या बैठकीसाठी उपस्थित रहावे,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version