शफाली वर्मा पुन्हा ठरली सरस

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत भारताची युवा महिला फलंदाज आणि लेडी सेहवाग अशी ओळख असलेल्या शफाली वर्माला फायदा झाला आहे. शफाली पुन्हा एकदा टी-20मध्ये जगातील नंबर वन महिला फलंदाज बनली आहे. श्रीलंकेची फलंदाज चमारी अटापट्टूनेही फलंदाजांच्या यादीत टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्याच मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर तिने 754 रेटिंग गुणांसह पहिले स्थान पटकावले. मात्र, बराच काळ एकही सामना न खेळल्याने तिची रेटिंग 724 पर्यंत खाली आली. शफालीचे रेटिंग गुण 726 आहे. 32 वर्षीय किवी खेळाडू सोफी डेव्हाईन 370 रेटिंग गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या दीप्ती शर्माने एका स्थानाने प्रगती केली, आता ती तिसर्‍या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी टॉप-10 मधून बाहेर पडली आहे.

Exit mobile version