कोट्यवधींचा निधी ‘लालफितीत’; प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने उभारलेले सभागृह आज अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून, इमारत गवताच्या विळख्यात सापडली आहे. एकीकडे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा हा जिवंत पुरावा ठरत असताना, दुसरीकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या सुशोभीकरणाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
महाड येथील क्रांतीभूमीत उभारण्यात आलेले छत्रपती शाहू महाराज सभागृह 2006 साली मोठ्या थाटामाटात लोकार्पित झाले होते. मात्र, आज या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी भगदाडे, मोडकळीस आलेल्या भिंती, उद्ध्वस्त स्वच्छतागृहे आणि सभागृहाभोवती वाढलेले गवत यामुळे ही वास्तू अक्षरशः पडीक झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, कोणतीही देखभाल होत नसल्याचे स्पष्ट दिसते.
शाहू महाराजांनी समाजातील विषमता दूर करत दलित, वंचित घटकांसाठी शिक्षण, पाणी व मंदिरांचे दरवाजे खुले केले. त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी उभारलेले हे सभागृह आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त होत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे उभारलेल्या समानतेच्या लढ्याच्या स्मृती जपण्यासाठी शासनाने सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले जाते. मात्र, हा निधी वर्षानुवर्षे लालफितीत अडकून पडला असून, प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. परिणामी, ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, ‘निधी मंजूर होतो, पण काम का होत नाही?’ असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे. ऐतिहासिक वारशाचा असा अवमान करणाऱ्या निष्क्रिय प्रशासनावर कठोर कारवाई करावी आणि तातडीने सभागृहाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.







