चोवीस तास राजकारण करणे ही सोपी गोष्ट नसते. शरद पवार गेली सुमारे साठ-पासष्ट वर्षे ते करीत आहेत. पैसे, पद आणि सत्ता मिळवण्यासाठी ते हे करतात असा आरोप त्यांचे शत्रू करू शकतात. पण तटस्थपणे पाहिले तर ते तितकेच नसते. लोकांचे भले करून विविध समूहांना आपल्याशी जोडणे आणि त्यातून त्यांची मते मिळवणे अशी बेरीज जमवणे हे सोपे नसते. पवार किंवा त्यांच्यापूर्वी त्यांचे गुरू यशवंतराव वा वसंतदादा यांना हे गणित सोडवण्याचा नाद होता. हा नाद एकदा जडला की तो सोडणे कठीण असते. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा पवारांचा निर्णय हा अनेकांना धक्का होता. तो अचानकपणे जाहीर करून त्यांना पक्षातल्या नेत्यां-कार्यकर्त्यांपासून ते बाहेरच्या लोकांपर्यंत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पवारांनीच स्थापन केला. सोनिया गांधींविरोधात बंडाचा झेंडा फडकवून बाहेर पडणे हे त्यावेळी सोपे नव्हते. काँग्रेस त्यावेळी आजच्यापेक्षा कितीतरी अधिक मजबूत स्थितीत होती. शिवाय, निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या होत्या. पक्षाला चिन्ह नवीन मिळणार होते. पण या सर्वांवर मात करून पवारांनी पक्ष उभा केला आणि त्यांना पहिल्याच प्रयत्नात राज्यात अर्धी का होईना पण सत्ता मिळाली. नंतर त्याच काँग्रेसशी जुळवून घेत ते दहा वर्षे केंद्रात मंत्रिपदावर राहिले. या स्थितीत पवारांची मंगळवारची घोषणा हेदेखील एक नवे राजकारणच असणार हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी किंवा पक्षात आपलाच हुकूम चालेल हे दाखवून देण्यासाठी पवारांनी हे धक्कातंत्र वापरले असे काही जणांना वाटू शकेल. पण ते एकूण घटनाक्रमाचे अतिसुलभीकरण होईल. पण अशा प्रकारचे भावनिक राजकारण ही पवारांची शैली नाही. ती इंदिरा गांधी किंवा बाळ ठाकरे यांची होती. कारण, त्यांचा वैयक्तिक करिश्मा हीच त्यांची ताकद होती. याउलट संघटना उभी करण्याची शक्ती हा पवारांचा करिश्मा आहे.
अजितदादांना वेसण?
1990 च्या दशकात बाळ ठाकरे यांच्यावर माधव देशपांडे या एकेकाळच्या शिवसैनिकाने घराणेशाहीचे वगैरे आरोप केले होते. दादरमध्ये त्यासाठी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काहीशी चलबिचल होते आहे असे वाटताच ठाकरे यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यावर शिवसैनिकांची तीव्र प्रतिक्रिया उमटली व ठाकरे यांनी निर्णय मागे घेतला होता. पवारांच्या निर्णयामुळे अनेकांना त्याची आठवण आली. त्यातून, पवारांनी पक्षाच्या बैठकीत नव्हे तर आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात अचानकपणे निर्णय जाहीर केल्याने या तर्कांना बळकटी मिळाली. या निर्णयानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादींना अश्रू अनावर झाले आणि कार्यक्रमाला आलेले कार्यकर्तेही घोषणाबाजी व शोकप्रदर्शन करू लागले. एखाद्या नाटकात किंवा सिनेमातच शोभावा असा हा प्रसंग प्रत्यक्षात घडल्याने आणि वृत्तवाहिन्यांनी लाईव्ह प्रसारण सुरू केल्याने हे पवारांचेही नाटकच आहे अशी अनेकांची भावना झाली. पण आपल्याच कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाठिंबा वदवून घेण्याची वेळ पवारांवर आली आहे असे वाटत नाही. पक्षावर अजूनही त्यांची पूर्ण पकड आहे हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. अजित पवार पहाटे शपथविधी करून बसलेले असताना राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार त्यांच्यापाठोपाठ जातील असे अनेकांना वाटत होते. पण पवारांनी आज जिथे निवृत्तीची घोषणा केली त्याच चव्हाण प्रतिष्ठानमधील कार्यालयात एका जागी बसून पवारांनी सर्व आमदारांना केवळ फोन केले आणि त्यांची चलबिचल संपली. एकही आमदार अजितदादांसोबत जाऊ शकला नाही. नंतर दादा परत आल्यावर त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल याचाही बंदोबस्त पवारांनी केला. अलिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांना जावे लागल्यास अजित पवार पुन्हा भाजपच्या साथीने सरकार स्थापन करू शकतात अशा अटकळी व्यक्त होत होत्या. त्यांना शह देण्यासाठी पवारांनी राजीनाम्याची खेळी खेळली असे म्हटले जात आहे. पण असलाच तर पवारांचा तो केवळ हेतू असावा.
सत्तेच्या हस्तांतरासाठी
मंगळवारी संध्याकाळी, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन पवारांनी या निर्णयाबाबत फेरविचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. आता कदाचित पवार अध्यक्षपदी कायम राहतील आणि दैनंदिन कामकाजासाठी कार्याध्यक्षाचे पद निर्माण करावे असा तोडगा निघेल. त्या जागी कोणाची वर्णी लागते यावरून पवारांच्या मनात काय आहे ते कळू शकेल. पण काहीही झाले तरी पवार आता पुढच्या काळासाठी पक्षाची नव्याने फेररचना करण्याच्या खटपटीत असावेत असे दिसते. आणि ते साहजिकही आहे. पवार हे 83 वर्षांचे आहेत आणि कर्करोगाविरुध्दची लढाई त्यांनी जिंकली असली तरी त्याचे परिणाम थोडेफार झाले आहेतच. दोनच दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची भाषा पवारांनी केली होती. पण पवार हा प्रयोग स्वतःवरच करतील अशी अपेक्षा नव्हती. आजवर प्रत्येक वेळी भाकरी परतणे ही जुन्यांना शिक्षा असा समज प्रचलित झाला आहे. पण पवार तो अर्थ बदलण्याच्या प्रयत्नात दिसतात. पवारांनी गेल्या काही वर्षात भाजपच्या हिंदुत्ववादाविरुध्द भूमिका घेतली आहे. मात्र राहुल गांधी यांच्याप्रमाणे भाजपशी थेट शत्रुत्व मात्र कधीही घेतलेले नाही. उलट अदानी वगैरे मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना अनुकूल भूमिकाच घेतली आहे. राष्ट्रवादीच्या बहुतांश कार्यकर्त्यांची जडणघडणही अशाच रीतीने झाली आहे. सत्तेच्या आडोशाने आणि तरीही सत्ताधीशांच्या विरोधातले राजकारण करण्याची ही कसरत पवारांनी आपल्या पक्षातील तरुण तुर्कांनाही शिकवली आहे. आपल्या नंतर ही घडी चालत राहील की नाही याची त्यांना चिंता असावी. शिवाय, पक्षाची सूत्रे सुविहितपणे सुप्रिया किंवा अजितदादांकडे कशी जातील हेही त्यांना पाहायचे असावे. पवारांची ही धडपड राष्ट्रवादीसाठी उपकारक असली तरी महाविकास आघाडीचे किती भले होईल हे सांगणे कठीण आहे. कारण, मोदी आणि भाजप यांच्या राजकारणाला स्पष्ट नकार देणारा पर्याय उभा केला तरच या आघाडीला भवितव्य असू शकते.