शौर्यची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या संघातून संधी

| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वरचा शौर्य लांगी याची दिल्ली येथे 31 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी चिपळूण येथील मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या संघात निवड झाली आहे. मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचा संघ सलग सहाव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असून, यापूर्वी तीन वेळा विजेतेपद पटकावत अकॅडमीने आपल्या सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारी ही अकॅडमी कोकणातील नावाजलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रांपैकी एक मानली जाते. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात अकॅडमीने मोलाची भूमिका बजावली आहे. शौर्यने जिद्द, कठोर सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर या संघात स्थान मिळवले आहे.

वडील सुयोग लांगी यांचा भक्कम पाठिंबा आणि प्रशिक्षक आकाश पवार यांचे परिश्रम व दर्जेदार प्रशिक्षण यामुळेच त्याला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र इन्व्हिटेशन स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या पार्थ हरेकर याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. संघात साईश खेडेकर, ऋग्वेद मोहिते, सादीम साबळे, अहिल बालाभाई, अथर्व सागवेकर, अर्णव मोरे, मुहम्मद तांबे, अनुज वामने, शौर्य लांगी, आराध्य कदम, मोहम्मद सईद, अर्जुन कदम आणि दाऊद परकार यांचा समावेश आहे. या स्पर्धेत शौर्य आपल्या उत्कृष्ट कामगिरीने हरिहरेश्वर, श्रीवर्धन तालुका आणि रायगड जिल्ह्याचा नावलौकिक उंचावेल असा विश्वास व्यक्त करत विविध स्तरातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Exit mobile version