आजाराने ग्रासलेल्या कुरेशी कुटूंबियांना मदतीचा हात; विद्यार्थिनीचा शिक्षणाचा मार्ग सुकर
। नेरळ । वार्ताहर ।
आधीच आर्थिक स्थिती बिकट, त्यात आलेले वडिलांचे आजारपण, हे काय कमी म्हणून वयाच्या पस्तिशीमध्ये हृदयविकाराने त्रस्त असताना डॉक्टरांनी हार्ट ट्रान्स्फरसारखी मोठी शस्त्रक्रिया करण्याचा दिलेला सल्ला, यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या इम्रान कुरेशी यांची पुरती कोंडी झाली. अशातच पदरात असलेल्या 3 मुली, त्यांचे शिक्षण त्यामुळे खचून गेलेल्या इम्रानवर मुलींचे शिक्षण थांबविण्याची वेळ आली. मात्र ही गोष्ट ‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेच्या पदाधिकार्यांना समजताच त्यांनी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना आधार दिला.
कर्जत तालुक्यातील कळंब येथील इम्रान कुरेश यांच्या वयोवृद्ध वडिलांना कँसरसारखा आजार जडला आहे. घरात कमावता कोणी नाही आणि खाणारे अनेक अशी स्थिती असून संसाराचा गाडा चालविताना त्या कुटुंबाची सर्कस सुरू होती. मात्र, नालासोपारा येथील ‘सामाजिक बांधिलकी’ संस्थेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी या कुटूंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला.
इमरान कुरेशी यांना तीन मुली आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना, त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले. त्या कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती हृदयविकारसारख्या आजाराने त्रस्त असताना त्यांचे अंथरुणाला खिळून बसलेल्या वयोवृद्ध वडिलांना कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासले. मात्र तरीही न खचता इम्रान स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत, वडिलांवर उपचार व्हावे, म्हणून धडपड करतांना त्याची दमछाक होत होती.
अशातच पदरी तीन मुली, कुटूंबाची जबाबदारी एकट्यावर आल्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे काय होणार, या विवंचनेत कुरेशी कुटुंबीय होते. त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत असून मोठी मुलगी इशरा कुरेशी यावर्षी दहावी पास झाली तर बुशरा कुरेशी सातवीत शिकत आहे. मात्र पुढील शिक्षण कसे होणार, म्हणून तणावाखाली असलेल्या कुरेशी कुटूंबियांचा प्रश्न सामाजिक संस्थेने सोडविला. नालासोपारा येथील नावाप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपणारी, सामाजिक बांधिलकी संस्था त्यांच्या मदतीला धावून आली.
या संस्थेने कुरेशी यांच्या दोन्ही मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली. सामजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी कुरेशी कुटुंबाची व्यथा नालासोपारा येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर यांच्या कानावर घातली. त्या प्रस्तावावर संस्थेने गांभीर्याने विचार केला आणि त्या विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा खर्च
कुरेशी कुटुंबाची परिस्थिती पाहता त्यांच्या मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, याची दक्षता सामजिक बांधिलकी घेईल. त्यांचा पुढील शिक्षणाचा खर्च संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक बांधिलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कामेरकर यांनी दिले. या संस्थेकडून त्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांच्या घरी जावून देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपसचिव शेखर पेणकर, संदेश कामेरकर, कळंब येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाहनवाज पानसरे तसेच शब्बीर कुरेशी उपस्थित होते.