शेतकरी कामगार पक्षाची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नाशिकमधील महिला अत्याचारातील आरोपी अशोक खरात (कॅप्टन) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. या प्रकरणाने महिला सुरक्षा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित गंभीर आरोपांमुळे सामाजिक संताप उसळला आहे. अशातच अशोक खरात या भोंदूबाबाने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणात महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अथवा सरकारने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे, अशी मागणी शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
मागची काही प्रकरणे पाहता चाकणकर यांनी महिलांना न्याय मिळावा, यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे न्याय नसेल तर पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आंदोलने आणि सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. या प्रकरणात सरकारने ठोस पावले उचलून पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीका करीत महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
भोंदू बाबाच्या आहारी जाऊन त्यांना बळकट करण्याचे काम महिला आयोग अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर करत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत नुकताच जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात, पोथ्या-पुराणे बंद करून सासरी जाणाऱ्या मुलीच्या हाती संविधानाची प्रत द्या, असे सांगितले. इतके पुरोगामी विचार मांडणाऱ्या महिला आयोग अध्यक्षा प्रत्यक्षात विरोधाभासी भूमिका घेत असल्याने भोंदूबाबापेक्षाही भोंदू आहेत, असे वाटते. कोणीही चाकणकर यांची बाजू न घेता त्यांचा तात्काळ राजीनामा घेणे क्रमप्राप्त आहे. महिला आयोगामध्ये सर्वपक्षीय महिलांना सदस्यत्व देण्यात यावे, ही वर्षभरापासून मागणी केली जात आहे. त्याची दखल शासनाने घेणे आवश्यक आहे .
ॲड. मानसी म्हात्रे
शेकाप महिला आघाडी प्रमुख
महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांनी महिलांना न्याय मिळवून देणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. परिणामी, त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनाही या प्रकरणात लक्ष घालावे. एक महिला म्हणून सुनेत्राताईंनी चाकणकर यांची पाठराखण न करता, त्यांच्या या वागणुकीबद्दल त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.
श्रद्धा ठाकूर,
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस






