महागाईविरोधात शेकाप आक्रमक

माणगाव तहसीलदारांना निवेदन
भरमसाठ दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला : तालुका चिटणीस मोरे
माणगाव | वार्ताहर |
शासनाने गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत केलेल्या भरमसाठ दरवाढीबाबत माणगावात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेकापतर्फे तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली दि.23 ऑगस्ट रोजी सकाळी माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शासनाकडे पोहोचवावे, अशी विनंती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी करून भरमसाठ दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आल्याचे सांगितले.
माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांना निवेदन देताना तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्यासमवेत माणगाव कृउबा समितीचे सभापती संजय पंदेरे, राजिपच्या माजी सदस्या गौरी पहेर, मोर्बा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास गोठल, देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश गुगळे, खरवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील सकपाळ, ज्येष्ठ कार्यकर्ते हसनमिया बंदरकर, रमेश बक्कम, युवा कार्यकर्ते बळीराम खडतर, नितीन वाघमारे, चंद्रकांत शिंदे, नथुराम आडीत आदींसह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकापतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाकडून घरगुती वापरात आवश्यक असलेल्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह राज्यातील गोरगरीब जनतेसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गरिबांना एक वेळचे जेवण मिळणेदेखील कठीण होऊन बसले आहे. कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार बंद पडलेला आहे. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झालेले असून अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्या कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.त्यातून सावरत असतानाच निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर तसेच दरडी कोसळल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. मात्र, शासनाकडून गॅस सिलिंडरच्या किंमती कमी न होता त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शासनाकडून गॅस सिलिंडरवर जी सबसिडी देण्यात येत होती, तीदेखील आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version