आत्करगांवमधील इच्छुक उमेदवारांना पक्षाचा हिरवा कंदील
| खोपोली | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष उमेदवारांची चाचपणी करीत असतानाच निवडणूक लढविण्यासाठी शेकापक्षाने रणशिंग फुंकले आहे. भविष्यात युती, आघाडी काय होईल ते होईल मात्र आत्करगांव जि.प गट आणि आत्करगांव आणि खानाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार इच्छुक असून त्यांना हिरवा कंदील दिल्याची माहिती शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे येथील सभागृहात पार पडली. याप्रसंगी शेकापक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, कर्जत-खालापूर विधानसभा चिटणीस संतोष जंगम, राम देशमुख, गौरू पाटील, खंडू पाटील, परशुराम पाटील, संतोष पाटील, प्रवीण लाले, भूषण कडव, प्रसाद तावडे, शांताराम पाटील, हरिश्चंद्र पाटील,निलेश घोसाळकर, चंद्रकांत घोसाळकर, हनुमंत पाटील, गणेश पालकर यांच्यासह शेकापक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्हा परिषदेत अनेक वर्ष सत्ता होती आणि यापुढेही राहणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. मनोधैर्य वाढवून पक्षाची ताकद दाखविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले असल्याचे युवा मोर्चा जिल्हा चिटणीस सदस्य भूषण कडव यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सरकारची पावले बदलत असली तरी इतर पक्षाचे उमेदवार प्रचारत दंग असताना आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, यासाठी बैठक आयोजित केल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते राम देशमुख यांनी कौतुक केले.
खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आपली ताकद सर्वांना समजणार आहे. तशीच ताकद जि.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दाखवू यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे अवाहन तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले. तसेच आत्करगांव जिल्हा परिषद गटातून संतोष पाटील यांच्या पत्नी निता पाटील, आत्करगांव पंचायत समिती गणातून महादू लाले यांच्या स्नुषा सुष्मा प्रदीप लाले तर खानाव पंचायत समिती गणातून शांताराम पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकता दर्शविल्यावर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला. पक्ष संपूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, असा शब्द किशोर पाटील यांनी बोलताना दिला आहे.
