गावे, वाड्यांच्या विकासासाठी शेकाप कटीबध्द – चित्रलेखा पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेकापचे नेते माजी आ. पंडित पाटील, सुप्रिया पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांनी यापुर्वी या विभागाचे नेतृत्व केले आहे. अनेक प्रश्‍न सोडविण्यासाठी ते कायमच कटीबध्द राहिले आहेत. परंतु गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या आमदारांमुळे या भागात विकासाला ग्रहण लागले. अनेक पाण्याचे प्रश्‍न रखडले आहेत. रोजगाराचा प्रश्‍न आहेत, त्याची सोडवणूक करण्यास विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत.फक्त बॅनरबाजी करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. तुमच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा प्रश्‍न नक्की सोडवेन,बचत गट उभारून महिलांना रोजगाराचे दालन खुले करून देईल, असा विश्‍वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

1 / 6

याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांपासून महिला संवाद मेळावा सुरु आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहे. पाटील कुटूंबियासह शेतकरी कामगार पक्षावर असलेल्या प्रेमामुळे हा प्रतिसाद दिसून येत आहे. समाजाचा विकास महिलाच करू शकते. समाजाची खरी ताकद महिलाच आहे. महिलांचा सर्वांगिण विकास व्हावा, त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजविण्याची गरज आहे. कुटूंब चालविण्याबरोबरच समाजाचा कारभार महिला चालविण्याचे काम महिला सक्षमपणे करते. त्यामुळे कोणत्याही संकटाशी सामना करण्याची शक्ती ही महिलेमध्ये आहे. याची जाणीव या सरकारला असणे आवश्यक आहे.

बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महिला बचत गटांसाठी बचत गट भवन उभारण्याचा मानस आहे. त्यांना कष्टाने 15 हजार रुपये कमविण्याची ताकद निर्माण करून दिली जाईल, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यानी दिली. त्या पुढे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षेचा, रोजगाराचा प्रश्‍नदेखील गंभीर आहे. बदलापूरसह उरण येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. महिलांना सुरक्षितता देणे ही सरकारची जबाबदारी आहे.त्यासाठी महिलांनी लढले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. आजच्या हूकूमशाही व दडपशाही विरोधात लढण्यासाठी महिलांनी संघटीत होण्याची गरज आहे, असे असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version