शेकापचं ठरलं! जुना हिशेब चुकता करणार

उद्याचा सूर्य आमचा असेल

आ. जयंत पाटील यांची गर्जना

। स्व. भाई मोहन पाटील नगरी, वडखळ । भारत रांजणकर ।

ज्यांच्यावर भरवसा ठेवला त्यांनीच विश्‍वासघात केला. मात्र यापुढे फसणार नाही आता जुना हिशेब चुकता करुन, पुन्हा नव्या त्वेषाने नवीन दमाने पुन्हा आपल्याला लढायचे आहे. फक्त रायगडात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्याला लढायचे आहे. आपण हिमंत हरायची नाही. कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर पुन्हा एकदा इतिहास घडवून रायगडावर शेकापक्षाचे वर्चस्व निर्माण करायचे आहे असा निर्धार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला.

वडखळ येथे स्व. भाई मोहन पाटीलनगरीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला आम आदमी पक्षाचे दिल्ली सरकारमधील पर्यावरणमंत्री गोपाळ राय, शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार आमदार बाळाराम पाटील, आमदार श्यामसुंदर पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, आपचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सेहगल, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेश महिला आघाडी प्रमुख आशाताई शिंदे, ज्येष्ठ नेते प्रा.एस.व्ही. जाधव, अ‍ॅड. राजू कोरडे, माजी नगराध्यक्ष डॉ प्रशांत नाईक, पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ प्रितम म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्ष साम्या कोरडे, नाना सावंत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जि.प. माजी अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा पाटील, चित्रा पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, राहूल देशमुख, विकास शिंदे, रामदास जराते, नृपाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ङ्गयापुर्वीही शेकापसमोर अशी खडतर आव्हाने आली. पण प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या जोरावर पक्षाने उभारी घेतली. 72 साली झालेल्या निवडणुकीत शेकापचा एकच आमदार आला होता. पण 77 साली शेकापने आपले खासदार आणि आमदार निवडून आणले. 96 सालीही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण 98 साली शेकापचे राम ठाकूर पैशाच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून आले. कार्यकर्त्यांनी खासदारकी खेचून आणली. अंतुलेसारख्या नेत्याचा दोन वेळा पराभव केला. हीच गोष्ट पुन्हा करू शकत नाही का असा सवाल करीत फक्त तुमची साथ हवी. हिंमत हरायची नाही,फ असा आशावाद जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

पेण मध्ये शेकापक्षाकडे 45 वर्षे आमदारकी आहे. धैर्यशिलला आज माजी बोलताना प्रचंड राग येतो. तो माजी नाही तर भावी आमदार आहे. त्याचा पराभव गद्दारीने झाला. विधीमंडळात शेकापक्षाचे लढाऊ आमदार दिले ते प्रभावीपणे काम करतात तसे त्यांचे रेकॉर्डही उपलब्ध आहेत. आपल्याला लढून पुन्हा खर्‍या अर्थाने वैभव आणायचे आहे. पनवेलची आमदारकीपण आपण घेऊच आणि महानगरपालिकेवरदेखील लाल बावटाच असेल असा विश्‍वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पनवेलमध्ये महिलांचे संघटत मजबूत करण्याचे मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला. शेकापचा इतिहास वैभवशाली आहे. तो इतिहास नवीन पिढीसमोर तसेच शासकीय अधिकार्‍यांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे.

काही दिवसात 50 हजार शेतकरी, कामगार यांना एकत्र करुन रस्त्यावर उतरविण्याची ताकद केवळ शेकापक्षातच आहे. बदला तर घ्यावाच लागणार आहे. तडजोडीला राजकारण म्हणतात, शिवाजी महाराजांनीदेखील मिर्झा राजेंसमवेत तडजोडीचे राजकारण केले. सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. केंद्र सरकारने पीक विमा योजनेतून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या काळात पिक विमा कंपन्यांना 40 हजार कोटींचा फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. देशात 64 कोटींचा घोटाळा बोफोर्समध्ये झाला, त्यामुळे राजीव गांधींचे सरकार गेले. मात्र पिकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा होऊन देखील कोणी बोलत नाही याबाबत आ. पाटील यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

पहिल्यांदाच कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी काढुन वर्धापनदिन साजरा केला. त्याचा मला अभिमान वाटतो. याचबरोबर, निवडणुका कशा लढल्या जातात हे आता आम्हाला समजले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात शेकाप स्वतःचा पक्षनिधी गोळा करणार आहे. मावळतीचा सूर्य साक्षीला आहे, उद्या पुन्हा उगवणारा सुर्य आपलाच असेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भाषणात त्यांनी राज्यपालांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावर टीका केली. राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास कळलाच नसल्याचे ते म्हणाले. शेकापच्या वतीने राज्यपालांची भेट घेऊन मुंबईचा इतिहास पुसण्याची कल्पनादेखील करुन नका असे सांगणार असल्याचे ते म्हणाले.

तर जेएसडब्ल्यू विरोधात महामार्गावर चक्का जाम

शेतकरी संप यशस्वी केला, शेकापने रिलायन्सविरोधातील यशस्वी लढाई जिंकली. सेझला घालवले. जर जेएसडब्ल्यूने महिन्याभरात आपले धोरण स्पष्ट केले नाही तर मुंबई गोवा महामार्ग तसेच अलिबाग वडखळ महामार्ग बंद करु असा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला. संपूर्ण जिल्ह्यातील शेकाप कार्यकर्ता शेतकर्‍यांच्या पाठी ठामपणे उभा राहील असा विश्‍वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कंपनीच्याच प्रोजेक्ट रिपोर्टनुसार एक लाख लोकांना जेएसडब्ल्यूने नोकर्‍या दिल्या पाहिजेत. त्या आम्ही मिळवून देऊ.

ते पुढे म्हणाले, शेकापक्षाचा इतिहास लक्षात ठेवा. जेएसडब्ल्यूला सांगू इच्छितो आमच्या आजोबांनी ज्या वाशीतल्या शेतकर्‍यांसाठी संप केला तिथला शेतकरी नष्ट करण्याचे काम नाना पाटीलांचा हा नातू करु देणार नाही. खोट्या सह्यांनी जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ देणार नाही. त्यासंदर्भात लक्षवेधीदेखील मांडली होती. त्या दृष्टीने कायदा करण्याचे आश्‍वासन तत्कालिन सरकारने दिले होते. मात्र वेळकाढू धोरणामुळे उशीर झाला आणि त्यानंतर सत्तांतर झाले. मात्र शेतकर्‍यांच्या हक्कासाठी विधीमंडळात लढू नाहीतर शेट्टी, गोपाळराय यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन लढा देण्याचीही तयारी असल्याचे ते म्हणाले.

Exit mobile version