। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाला घेतल्याशिवाय रायगड जिल्ह्याचे राजकारण शक्यच नाही. फक्त आणि फक्त कपटनितीमुळेच शेकापक्षाचा पराभव झाला. मात्र संघटना कधीच संपत नसते. पक्षातून अनेक गेले पण आजही शेकापक्ष उभा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेकापक्षाला गतवैभव प्राप्त होईल; यात शंका नाही, असा विश्वास शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला. ते शेकापक्ष वर्धापन दिनाच्या तयारीनिमित्त मंगळवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या सहाण येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य सुरेश खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, संजय पाटील, देवेंद्र पाटील, जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, तालुका चिटणीस अनिल पाटील, अॅड. गौतम पाटील, अॅड. सचिन जोशी, चित्रा पाटील, संतोष जंगम, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, शहर चिटणीस अशोक प्रधान, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, नंदकुमार मयेकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार पंडित पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रमुख पक्ष हा शेकापक्ष आहे. कार्यकर्त्यांना कसलेही शिवबंधन नाही, बाँड नाही, सत्ता नाही तरीदेखील कार्यकर्ते ठाम असणारा शेकापक्ष आहे. निवडणूकीत जो पराभव झाला तो माझा नाही तर संघटनेचा झाला आहे. त्यासाठी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. असंख्य प्रसंग आले तरी आपण डगमगलो नाही. लोकशाही आहे, त्यामुळे जय पराजय येत असतात. मात्र बचेंगे तो और भी लढेंगे, या उर्मीने आपल्याला पुन्हा उभे रहायचे आहे. कोणाला निवडून द्यायचे ते फेसबूक व्हॉटस्अॅप ठरवत नाही, तर जनता ठरवते. आ. जयंत पाटील, चित्रलेखा पाटील यांनी जिल्ह्यात मोठया प्रमाणावर काम केले आहे. पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर शेकापची गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी दुर करा. ही विचारसरणीच उपयोगी पडेल. जनतेच्या प्रश्नांसाठी फक्त शेकापक्षच रस्त्यावर उतरतो. जिल्ह्याच्या नेत्यांनी फक्त आपल्या विभागापुरते किंवा मतदारसंघापुरते काम न करता पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पंडित पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारला आवर्जून धन्यवाद दिले.
माजी जि.प. सदस्य सुरेश खैरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध असल्याने आपल्याला वर्धापन दिन मोठया प्रमाणावर साजरा करता आला नाही. त्यामुळे यावेळी त्याची कसर भरुन काढत मोठया दिमाखात वर्धापन दिन साजरा करायचा आहे. जिल्ह्यावर शेकापचे वर्चस्व कायम राहील. पक्षाचा पराभव झाला तरी आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून आपण विकासात कुठेही कमी पडलो नाही. जिल्हा परिषदेत शेकापक्षाने प्रभावीपणे सत्ता राबवीली आहे. विरोधकही मान्य करतात की, जिल्हा परिषद चालवावी ते शेकापक्षानेच. यातच आपला गौरव आहे. सध्याच्या काळात आपल्याला पोषक वातावरण असून मागील पराभवाचा वचपा काढुन आपल्याला विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे. शेकापक्षच एक नंबरला आहे हे जिल्ह्यात पुन्हा एकदा दाखवून दयायचे असल्याचेही ते म्हणाले.
शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. घरातून निघताना गाडीला झेंडा लावून यायचे आहे. 28 जुलै पासून शेकाप वर्धापन दिनाबद्दल माहिती परिसरात सर्वांना व्हावी. जयंत पाटील हे आपले नेते सर्वांना उपलब्ध असतात आणि त्यामुळे कोणीही स्टेजवर उपस्थित राहू नये. नियमांचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी शेकापला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही रायगड जिल्हा परिषदेची सत्ता घेता येणार नाही, हे लक्षात घेवून आपल्या पक्षासाठी राजकीय काळ महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही यावेळी सर्व बाबी तपासून घेणार आहोत, असे जाहीर केले. प्रस्तावना जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक यांनी तर आभार तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी मानले.
शेकापचा इतिहास पोहचविण्यात कमी पडलो
जिल्ह्यात खेडोपाडी शिक्षण पोहचविण्याचे काम अॅड. दत्ता पाटील, स्व. प्रभाकर पाटील यांनी केले. बॅ. अंतुले आणि प्रभाकर पाटील यांनी जिल्ह्याचे नाव बदलले. पण जिल्ह्याचा नामांतर प्रस्ताव सर्वप्रथम प्रभाकर पाटील यांनी मांडला. रायगडावर सर्वप्रथम शिवराज्याभिषेक सोहळा सुरु केला तो प्रभाकर पाटील यांनीच. मात्र आपण आपला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यात कमी पडल्याची खंत पंडित पाटील यांनी व्यक्त केली.
वर्धापनदिनी घराघरावर लाल बावटा
शेकापक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी चार दिवस आधीपासूनच आपापल्या घरावर लाल बावटा फडकवून शेकापक्षाची ताकद दाखवून द्यायची आहे. तसेच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारे बॅनर प्रत्येक गावागावात नाक्या नाक्यावर लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. वर्धापन दिनाला येताना प्रत्येक गाडीवर लाल बावटा फडकवत येण्याचे आवाहन अॅड. आस्वाद पाटील, सुरेश खैरे यांनी केले.