। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ ते खानाव परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत उपअभियंता सुभाष कुंभार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना आणि समस्या निदर्शनास आणून दिल्या.
मागील महिनाभर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. कधी पाणी येते तर कधी येत नाही, आणि पाणी आले तरी कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे सर्व जनतेला पाणी मिळत नाही. त्यात आजून एक मोठी समस्या म्हणजे जागोजागी अनधिकृत टॅब मारल्यामुळे पाण्याचा प्रेशर कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन येत्या चार दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत ‘हंडा मोर्चा’ काढून एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच, जनतेच्या मूलभूत हक्कासाठीचा हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील, असा इशाराही शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी उपसरपंच नरेश वर्तक, मंगेश वाळंज, रंजित तुणतुणे तसेच विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अलिबाग: एमआयडीसीच्या कार्यालयावर शेकापची धडक
