गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप कायम कटिबद्ध – आ.जयंत पाटील

कोपर येथे सावित्रीच्या लेकींना सायकलचे वाटप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यात जवळपास 14623 हून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. लवकरच 1 लाख सायकल वाटपाचा संकल्प पूर्ण करणार आहोत. शेकापची कायमच गोर, गरीब जनतेशी नाळ जोडली गेली आहे. चरी ग्रामपंचायत पाठोपाठ कोपर येथे मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध असलेला शेतकरी कामगार पक्ष आहे. सायकल वाटप मदत नव्हे, तर कर्तव्य म्हणून करतो, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.

‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे’ या उपक्रमांतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि हुशार मुलींना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते कोपर येथे सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शेकापचे माजी जिल्हा परिषद प्रतोद, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी पं. स. सदस्य संदीप घरत, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, चरी – कोपरच्या सरपंच निलिमा पाटील, माजी सरपंच जयराम ठाकुर, माजी सरपंच विजय ठाकुर, वसंत ठाकुर, जगदिश ठाकुर, चिंतामणी ठाकुर, प्रकाश ठाकुर, जनार्दन ठाकुर, रामचंद्र ठाकुर, तुकाराम ठाकुर, सुधाकर थळे आणि इतर कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी संगितले की, शेतकर्‍यांच्या हितासाठी जीवनभर लढणारा नेता म्हणजे आमचे आजोबा स्व. नारायण नागू पाटील. जगातील सर्वात मोठा शेतकर्‍यांचा चरी कोपरचा ऐतिहासिक संप व त्यानंतर शासनाला कायदा करण्यास भाग पाडणारे असे ते लढवय्ये नेते होते. त्यांच्यापासून ते आजपर्यंत येथील शेतकरी, ग्रामस्थ शेकापसोबत कायम एकनिष्ठ आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. गावांचा विकास करणे हे आमचे कर्तव्य समजतो.

कोपर गावासाठी लवकरच आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता 1 कोटी 17 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला असून या कामाचा शुभारंभ काही दिवसांत करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेकरीता 43 लाख रुपये मंजूर केले आहेत याचे काम सुद्धा लवकर सुरू होईल, असे आमदार जयंत पाटील यांनी संगितले.

Exit mobile version