शेकाप महिलांच्या पाठीशी कायम- चित्रलेखा पाटील

| पंढरपूर | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील शिंदे या तरुणीची क्रूर हत्या करण्यात आली. ही भयानक अशी घटना आहे. नुकतीच या कुटुंबियांची भेट घेतली. यशश्रीच्या आईसोबत चर्चा केली. त्यावेळी तिच्या आईने आता तरी आरोपीला जामीन देऊ नका, अशी मागणी केली. मागे झालेल्या एका घटनेत या आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याला जामीन मिळाल्यावर मोकाट झाला. म्हणून एका तरुणीची हत्या झाली. त्याला राज्य सरकार व पोलीस यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केला.

सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती केल्या. पण, आज सर्वच ठिकाणी या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महिला, तरुणीवर अत्याचार करून त्यांचा खून केला जात आहे. मात्र, राज्यकर्ते, पोलीस यंत्रणा या हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून महिला, तरुणींना सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकत्र येण्याची गरज आहे. या महिलांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षेसाठी शेतकरी कामगार पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन लढा दिला पाहिजे, तरच हे सरकार महिलांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देईल. आज शहरी भागासह ग्रामीण भागातील अनेक महिला, मुली वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.शाळा, कॉलेज, नोकरीच्या ठिकाणी जाताना त्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना कायमच पडत आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळे निर्णय सरकारने घेतले. परंतु, त्याची ठोस अंमलबजावणी होत असे चित्र नाही, त्यामुळे या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.

Exit mobile version