शेकापचे सहचिटणीस यशवंत ठाकूर यांना पत्नीशोक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस यशवंत हरिश्चंद्र ठाकूर यांच्या पत्नी सावित्री ठाकूर यांचे 4 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने उरण तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक समर्पित, जिव्हाळ्याची व जनतेशी नाळ जुळलेली व्यक्ती हरपली असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

कै. सावित्री ठाकूर या ‘ताई’ या नावाने सर्वत्र परिचित होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या कुटुंबासह समाजसेवेची परंपरा जपली. पक्षनिष्ठा आणि समाजाबद्दलची बांधिलकी यांचा उत्तम समन्वय त्यांच्या कार्यात नेहमी दिसून येत असे. यशवंत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 31 वर्षे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या व पुस्तकांचे वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने राबवला. त्यांचे सासर व माहेर दोन्ही कुटुंबांचा भारतीय शेतकरी कामगार पक्षाशी पिढ्यानपिढ्या असलेला एकनिष्ठ संबंध त्यांनी अभिमानाने जपला. अंत्ययात्रेसमयी त्यांच्या अंगावर पक्षाची निशाणी असलेली शाल असणे, ही त्यांच्या पक्षनिष्ठेची साक्ष आहे.

उरण तालुक्यातील तसेच बोकडविरा गावातील विविध समस्यांसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये त्या नेहमी हिरिरीने सहभागी होत. त्या बोकडविरा ग्रामपंचायत सदस्या होत्या. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याची त्यांची तळमळ सर्वांना प्रेरणादायी ठरली. अशा या जनतेच्या सेवेत अखंड कार्यरत राहिलेल्या कै. सावित्री यशवंत ठाकूर यांचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.13) श्री क्षेत्र माणकेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य दि.16 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी, बोकडविरा येथे करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पती यशवंत ठाकूर, चार मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version