मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन; मोहन गुंड यांचा पुढाकार
। केज । प्रतिनिधी ।
केज मंडळासह तालुक्यातील इतर मंडळातही सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास यल्लो मोजॅक चक्रीभुंगा, आळी इतर रोगाने हिरावून नेला आहे. पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतात फिरकायला तयार नाहीत. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून सरसकट अनुदान देण्यात यावे. तसेच शेतकर्यांना ग्रामीण योजनेचे लाभ द्यावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंबेजोगाई बीड रोडवर संभाजी राजे चौकात रस्ता आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सटवाई रस्ता वर्षभरापासून बंद आहे. तसेच धारुर रोडवरील सटवाई रस्त्यावरचे अतिक्रमण तात्काळ काढा, केज शहरातील शेतकर्यांना शेती पंपासाठी विद्युतपुरवठा सुरुळीत करा आदी विविध मागणयांसाठी आंदोलन करण्यात आले.
आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन तहसीलचे प्रतिनिधी पवार यांना देण्यात आले. तसेच मागण्यांचा तात्काळ विचार न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शेकाप नेते मोहन गुंड, नगरसेवक सोमनाथ गुंड, मनोराम पवार, अॅड. निखिल बचुटे, शुभम लोंढे, संदीप नाईकवाडे, संजय लोंढे, सुभाष कोल्हे, चंद्रकांत गुंड, अशोक रोडे, शाम चिंचोलीकर, दिनकर कदम, किशोर सुरवसे, रवी लोंढे, शेटे आप्पा, राजेभाऊ औटी, पांडुरंग हासवले, पोपट लोंढे, महेश लोंढे, राम डुकरे, आकाश चौरे, शकील शेख, अशोक गुंड, मुन्ना धनवडे आदींसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.