। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सन 2019 ला ज्यावेळी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा होत होता. त्यावेळी बिहार मधील सरकारने मुलींना शिक्षणासाठी मोफत सायकली वाटप केल्या होत्या. ती कल्पना मला खूप आवडली. आज मुलींना ग्रामीण भागातून शिक्षण घेताना खूप लांबून प्रवास करावा लागतो.कित्येक डोंगराळ भागातील तालुक्यातील मुली शिक्षण घेण्यासाठी पायपीट करावी लागते. मुली शिकल्या पाहिजे यासाठी जर त्यांना सायकल मिळाली तर त्यांना शिक्षण घेण्यास अधिक आनंद वाटणार आहे.यासाठी सायकल हा महत्वाचा दुवा आहे.आतापर्यंत अलिबाग,मुरुड व रोहा तालुक्यामधून 12 हजार सायकलींचे वाटप झाले आहे यापुढील काळात शेतकरी कामगार पक्षातर्फे एक लाख सायकली वाटप करण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
मुरुड तालुक्यामधील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर-नांदगाव येथील पटांगणावर उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील शालेय मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पाटील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षण घेऊन उच्चपदावर जाऊन आपल्या गावाची सेवा करावी. माणुसकी सोडू नका व आपल्या गावावर प्रेम करून येथील विकासासाठी मदत करावी. काही लोक विनाकारण टीका करीत आहेत.परंतु आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करणार आहोत.कुंपणावर बसून बॅटिंग कशी करावी हे कोणी आम्हाला शिकवू नये.टीका करण्यापेक्षा मैदान तुमच्यासाठी सुद्धा खुले आहे.प्रत्यक्ष मैदानात उतरा व बॅटिंग करा असा टोला यावेळी त्यांनी टीका करणार्यांना सुनावला आहे.सायकल वाटप कार्यक्रम संपताच लवकरच रायगड जिल्ह्यातील सरपंच यांची कार्यशाळा घेणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी त्यांनी नांदगाव हायस्कूल च्या विकासात्मक कामाला मदत करणार असल्याचे सांगितले.यावेळी उसरोली ग्रामपंचायत चे सरपंच मनीष नांदगावकर यांनी सायकल वाटपाचा हा स्तुत्य उपक्रम असून सायकल मिळाल्यामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती सुद्धा वाढली आहे.कुटुंबातील एक स्त्री शिकली पाहिजे यासाठी मुली शिकणे फार गरजेचे आहे.उत्तम दर्जाच्या सायकली वाटप केल्याबद्दल सरपंच नांदगावकर यांनी विशेष आभार व्यक्त केले.तसेच ज्यांनी सायकल वाटपासाठी विशेष मेहनत घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानले.
सदरील कार्यक्रमात उसरोली ग्रामपंचायत कडून श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतगर -नांदगाव हायस्कूला 15 व्या वित्त आयोगामधून व ग्रामपंचायत शिक्षण व आरोग्य 20 टक्के मधून संगणक संच देण्यात आले.या संगणक कक्षाचे उदघाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.तसेच उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील सुमारे 80 मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.सदरील प्रसंगी शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्यासपीठावर उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर, गम्बानी, अजीत कासार, बोर्ली सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच महेशकुमार पाटील, फैरोज घलटे, बाबू नागावकर, चेरमन तुकाराम पाटील,अॅड. विनय शेडगे, उत्तमराव वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.