भेडसवणार्‍या समस्या शेकापच सोडवणार- प्रीतम म्हात्रे

। उरण । प्रतिनिधी ।

उलवे हा सिडकोचा विकसित नोड आहे. मात्र, येथील रहिवाशांना अनेक सार्वजनिक, सामाजिक, नागरी तसेच जीवनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत सिडको पुर्णतः उदासिन असून येथील शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायती व पक्ष पातळीवर येथील रहिवाशांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यात आलेल्या आहेत. भविष्यातही येथील रहिवाशांच्या समस्या शेकापच सोडवणार असल्याची ग्वाही उरण विधानसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे. उलवे नोड येथे प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रीतम म्हात्रे म्हणाले की, शेकाप सत्तेसाठी कधीच राजकारण करीत नाही. सत्ता असो वा नसो, शेकाप जनतेच्या प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी सतत जनतेत राहतो. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेकापने अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. तसेच, शहर एवढे सुसज्ज आहे, मात्र शहरात कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. गव्हाण ग्रामपंच्यायतीच्या माध्यमातून आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथील शाळा प्रवेशाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शेकाप दक्ष राहील. तसेच, येथील लहान-मोठ्या समस्या दूर करण्यासाठी चोवीस तास सेवा केंद्र सुरू करणार. येथील बेकारी व बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच महिलांच्या आरोग्य सुविधांसाठी विशेष अभियान राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, कॉम्रेड भुषण पाटील, प्रा. एल.बी. पाटील, उरण उत्कर्ष सभेचे गोपाळ पाटील, आगरी समाज नेते राजाराम पाटील, रिपाई नेते महेश साळुंके, काँग्रेस उपाध्यक्ष व्ही.बी. म्हात्रे, पांडू घरत, रवि घरत, रमाकांत म्हात्रे, कृष्णाजी म्हात्रे, माधव पाटील, नारायणशेठ घरत, राजन घरत, धीरज कालेकर, सीमा घरत, जितेंद्र म्हात्रे, विनोद साबळे, सचिन ताडफले आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेतला तरूण उमेदवार दिलाः नारायणशेठ घरत
उरण विधानसभा मतदार संघातून गेली 10 वर्ष शेकापचा आमदार नसल्याने मतदार संघातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. येथील माजी आमदांचे रात्रीचे धंदे चालत असतात. तर, विद्यमान आमदाराला सेटिंग आणि दलालीतून जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सातत्याने जनतेत राहून जनतेचे प्रश्‍न सोडवणारा प्रीतम म्हात्रे यांच्या रूपाने तरूण उमेदवार शेकापने दिला आहे.
मराठा समाजाची ताकद दाखवूः विनोद साबळे
मराठा आरक्षणासाठी समाजाने राज्यव्यापी आंदोलन करूनही सरकारने समाजाला आरक्षण न देता मराठा समाजाची फसवणूक केली आहे. यामुळे समाजाने लोकसभेला आपली ताकद दाखवली होती. आता विधानसभेलाही मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा मराठा महासंघाचे नेते विनोद साबले यांनी दिला.
Exit mobile version