प्रीतम म्हात्रे यांचा गंभीर इशारा
। उरण । प्रतिनिधी ।
शासनाच्या आरटीई धोरणानुसार नववीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. मात्र येथील मुजोर शिक्षण संस्थाचालक पालकांना वेठीस धरून डोनेशनच्या नावाखाली सर्वसामान्यांची लुटमार करीत आहेत. या गोरगरीब जनतेची लुटमार थांबविण्यासाठी शेकाप अशा शिक्षणसम्राटांना आपला हिसका दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.
उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी उलवे सेक्टर 8-9 येथील रहिवाशांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी तेथील रहिवासी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
दरम्यान, प्रीतम म्हात्रे यांनी सोसायट्यांना तसेच येथील सर्वसमान्य जनतेला भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी या निवडणूकीत आपल्याला संधी देण्याची विनंती केली. यावेळी बोलताना शेकाप नेते सचिन ताडफळे म्हणाले की, पारिजातक आपल्या दारी, मात्र फुले पडतात शेजार्याच्या घरी, अशी आपली अवस्था झाली आहे. या सर्व गोष्टीचा निकाल लावण्यासाठी कार्यकुशल नेतृत्व प्रीतम म्हात्रे हेच एकमेव औषध आहे. जनसामान्यांचे प्रश्न जर ताकदीने सोडवायचे असतील तर विरोधातील निवृत उमेदवारांना घरी पाठवून उद्याचा उगवता सुर्य प्रीतम म्हात्रे यांना निवडून दिले पाहिजे. येत्या 20 तारखेला मतदार हे काम चोख बजावतील, अशी अपेक्षाही सचिन ताडफळे यांनी व्यक्त केली.