महाविकास आघाडीच्या मोर्चात शेकाप रस्त्यावर उतरणार

प्रागतिक आघाडीचाही सहभाग आ. जयंत पाटील यांची घोषणा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सीमाप्रश्‍नाबाबत शेकापक्षाची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. या प्रश्‍नावर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर यायला पाहिजे. 17 तारखेला होणार्‍या महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रादेशिक पक्षाच्या आघाडीचा पाठिंबा असल्याचे शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
सीमाप्रश्‍नाबाबत आपली भूमिका जाहीर करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, सीमावासियांच्या पाठीमागे नेहमीच डावे पक्ष ठामपणे उभे राहिलेले आहेत. आज जे सीमाभागात वातावरण केले जाते आहे, ते खेदजनक आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी याची सुरुवात केली. आज कर्नाटकसोबतच तेलंगणा आणि गुजरात सरकारदेखील त्यांच्या सीमानजीकची गावांची मागणी वाढू लागली आहे. या तीनही राज्यांमध्ये विशिष्ट विचारांचे लोक या ठिकाणी येताहेत आणि सीमावासियांना भडकविण्याचे काम करताहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले की, सीमावासियांपुरतेच नाही तर महाराष्ट्रातील जी सीमालगत गावे आहेत, त्या गावांमध्ये येऊन आम्हाला या गावांमध्ये राहायचे नाही, असे सांगितले जाते. ही गंभीर बाब आहे. उद्या कुणीही येईल आणि आम्ही पाकिस्तानमध्ये जायला मागतो सांगेल, अशी परवानगी आहे का? अशा प्रकारे भडकविण्याचे काम करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी करतानाच इथल्या ज्या अडचणी आहेत, विकास झालेला नाही, शिक्षणाचे प्रश्‍न आहेत, याचा विचार राज्य शासनाने ताबडतोब करायला पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.
सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्‍न प्रलंबित असतानाही बेळगावमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका घेणे आणि तेथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेणे हे आक्षेपार्ह आहे. याबाबत महाविकास आघाडीने अथनीमध्ये जो मोर्चा आयोजित केला आहे, त्याला आठ प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काल आपल्याशी चर्चा करत आमची भूमिका विचारली. त्यावर आमचेच काम तुम्ही करत आहात, आमची भूमिका वेगळी असण्याचे कारण नाही, आमचे प्रादेशिक पक्ष शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, माकप, भाकप अशा विविध प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने याला पाठिंबा दिल्याचेही जयंत पाटील यांनी जाहीर केले. राज्य शासनाने सीमाभागात कोण परप्रांतीय आलेले आहेत, हे शोधून काढले पाहिजे. याला आक्रमकरित्या विरोध करायला पाहिजे. या प्रश्‍नावर 17 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर यायला पाहिजे, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

छत्रपतींचा अवमान थांबवा
भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होत असलेला एकेरी उल्लेख, त्यांच्याबाबत चुकीचा इतिहास सांगून त्याचा असलेला अवमान खेदजनक आहे. आज राज्यासमोर अनेक प्रश्‍न उभे असताना लोकांना चुकीच्या गोष्टी सांगून वातावरण गढूळ करण्याचे काम करणार्‍यांनी ते तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. ओला दुष्काळ, गावरान जमिनीचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात असून, त्याच्या स्पष्ट झालेली नसताना अधिकार्‍यांकडून गावोगावी नोटिसा पाठविण्यात येत आहेत. याविषयी कोणी आवाज उठवित नाही, याचा खेद वाटतो, असे आ. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version