| रायगड, मुंबई | जिल्हा प्रतिनिधी |
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेकाप, महाविकास आघाडी-मनसेच्यावतीने मुंंबईत शनिवारी (दि.1) सत्याचा महामोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले कि, निवडणुकीत पहिला पाया मतदार याद्या आहेत. तो पाया नष्ट करण्याचे काम राज्यकर्ते करीत आहेत. दबाव आणून निवडणूक आयोगाला हाताशी धरून काम केले जात आहे. त्याच्याविरोधात हा विराट मोर्चा आहे. दुबार मतदार याद्या दुरुस्त केल्या नाही, तर रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला. बोगस मतदार याद्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी, मनसेच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणच्या मतदार यादीमध्ये दुबार नावे आहेत. वेगवेगळ्या भागातील नावे यादीमध्ये घुसविण्यात आली आहेत. चुकीची नावे टाकण्यात आली आहे. सदोष मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतून निवडणूका घेणे सरकारचा एकतर्फी निर्णय आहे. सत्ता आणि पैशाची मस्ती घेऊन राज्य केले जात आहे. निवडणुका घेतल्या जात आहेत. त्याला पूर्णपणे विरोध आहे. त्यासाठीच आज मुंबईत महाविकास आघाडी, मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुबार मतदार यांद्याबाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. त्यानंतर लवकरच पुढील भूमिका महाविकास आघाडीमार्फत घेतली जाईल. दुबार मतदार याद्यांविरोधात रस्त्यावर उतरून हा गैरप्रकार थांबवावा लागणार आहे, असे शेकाप नेते जयंत पाटील म्हणाले.
मतांचा अधिकार टिकविण्यासाठी एक व्हा: शरद पवार
मागील काही वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा पुकारण्यात आला होता. त्यावेळी असेच अनेक मोर्चे काढण्यात आले. आपल्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्रातील प्रत्येकजण या मोर्चात सहभागी झाले होते. आजच्या सत्याच्या मोर्चामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याची आठवण करून देत आहे. देशातील संसदीय लोकशाही जपण्याची वेळ आता आली आहे. संविधानाने दिलेला मतांचा अधिकार टिकविण्यासाठी एक व्हा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी संरक्षणमंत्री, खासदार शरद पवार यांनी केले. यावेळी शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूकीनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला. अनेक ठिकाणी आजही लोक अवस्थ आहेत. देशात सत्तेचा गैरवापर होत आहे.मतदार यांद्याच्या घोळाविरोधात आज सर्वांनी एकजूट दाखविली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवीच्या वेळी असेच मोर्चे निघाले, काळाघोडा परिसरातील मोर्चे विशेष होते. त्यानंतर आज सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखविली आहे. आजचा मोर्चा जुन्या गोष्टींची आठवण करून देणारा आहे. दुबार मतदार याद्या दुरुस्त होऊन निवडणुका पारदर्शक व्हाव्यात ही भूमिका आहे. त्यासाठीच आज सर्वजण एकवटले आहोत. वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असले, तरी देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यासाठी आज सर्वजण एक झाले आहेत, असे शरद पवार म्हणाले.







