खालापुरातील शेकाप कार्यकर्ते एकसंघ

आ. बाळाराम पाटील यांचे प्रतिपादन
| खोपोली | प्रतिनिधी |

खालापुरातील शेकापचे कार्यकर्ते एकसंघ असून, आपण कधीही बाजी मारू शकतो. संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवल्याने ही परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. शेकापचा कार्यकर्ता अगदी प्रामाणिक असून, वर्धापनदिन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आषाढी एकादशीच्या वारीप्रमाणे आहे, असे प्रतिपादन आ. बाळाराम पाटील यांनी केले.

खोपोली येथे लोहना समाज हॉल येथे रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी या मेळाव्याच्या सूचना करीत असताना, या बैठकीत आ. बाळाराम पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.

या नियोजन बैठकीसाठी आ. बाळाराम पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, सुरेश खैरे, जिल्हा बँकेचे प्रदीप नाईक, देवा पाटील, खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, खोपोली शहराचे चिटणीस अविनाश तावडे, जिल्हा नेते संतोष जंगम, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, किशोर पाटील, खोपोली माजी नगरसेवक, खालापूरचे नगरसेवक यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. महाराष्ट्रात मोठं राजकारण घडत असताना मोठी जबाबदारी देऊनही ते नेते त्याच्या नेत्यांशी व पक्षाशी प्रामाणिक नाहीत, पण शेकापचा कार्यकर्त्या आतापर्यंत कुठेही गेला नाही, याचा अभिमान आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात बैठका घेतल्या जातील आणि या मेळाव्यासाठी एक हजाराहून अधिक कार्यकर्ते खालापूर व खोपोली शहरातून उपस्थित राहणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. या बैठकीचे सूत्रसंचालन गुरुनाथ साठेलकर यांनी केले.

Exit mobile version