। कर्जत । प्रतिनिधी ।
शेकापच्या ज्येष्ठ नेत्या, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती चित्राताई तिटकारे (वय 80) यांचे मुलूंड येथील रुग्णालयात बुधवारी (दि.23) मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील आदींनी शोक व्यक्त केला आहे. चित्राताईंंच्या पार्थिवावर दुपारी भिसेगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य माजी खा.भाऊसाहेब राऊत यांच्या कनिष्ठ कन्या आणि कर्जतमधील ज्येष्ठ डॉ. बाळकृष्ण तिटकारे यांच्या पत्नी चित्राताई तिटकारे यांचे निधन झाले. भाऊसाहेब समाजकारण व राजकारणात असल्याने चित्राताईंना समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यानंतर त्या पंचायत समिती सदस्या आणि जिल्हा परिषद सदस्या होत्या. 1996 रोजी त्या राजिपच्या समाजकल्याण सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे बंधू वसंतराव राऊत व सुमंतराव राऊत आमदार होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाऊसाहेब राऊत यांचे मोठे योगदान होते. भाऊसाहेब राऊत यांना त्यावेळी तुरुंगवासही झाला होता. याची नोंद शासन दरबारी असल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 ऑक्टोबर 2007 रोजी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते राऊत कुटुंबातील सदस्यांचा तसेच भाऊसाहेबांची कन्या म्हणून चित्राताईं तिटकारेंचा सन्मानपत्र देवून मुंबई येथे सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पती डॉ. बाळकृष्ण तिटकारे, एक पूत्र, दोन कन्या, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.