| पनवेल । वार्ताहर ।
बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करून मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने खांदा वसाहतीमधील रायगड जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यानुसार 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध आस्थापन चालक, मालकांकडून हमीपत्र घेतली जाणार आहेत.
बाल कामगार प्रथा रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार रायगड जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना झाली आहे. या कृती दलामध्ये सरकारने सूचित केल्याप्रमाणे कामगार, पोलिस, अशासकीय संस्था, महिला व बालकल्याण विभागातील प्रतिनिधींचा समावेश आहे. या कृती दलामार्फत 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत बालदिनाचे औचित्य साधून बालकामगार प्रथेविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पनवेलमध्ये कापड बाजार, झव्हेरी बाजार, बाजारपेठा, दुकाने, विविध आस्थापनांना बालकामगार कामावर ठेऊ नये, यासाठीच्या सूचना तसेच हमीपत्र लिहून घेतले जात आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांवर तसेच बाजारपेठांमध्येही जनजागृती केली जात आहे.
जनजागृतीवर विशेष भर
बालकामगार प्रथेविरोधात 12 जून या आंतरराष्ट्रीय बालकामगार दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मुख्यत्वे हॉटेल, बांधकाम, व्यापारी संघटनांचे चर्चा सत्राबरोबरच धाबे, वीटभट्टी येथे भेटी देऊन तपासणी देखील केली जाते.
बालकामगार प्रथा बंद झाली पाहिजे, मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी विविध आस्थापना, नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील आस्थापनांकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र घेतले जाणार आहेत.
प्रदीप पवार
कामगार उपायुक्त, रायगड