उरणमध्ये शेकापचा मतटक्का वाढला

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

| चिरनेर | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने पक्षाला नवसंजीवनी प्राप्त झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाचे जुने व तरुण कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

उरण तालुका हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. तसेच लढाऊ तालुका म्हणूनही पक्षाची एक ओळख आहे. दरम्यान माजी खासदार दि.बा. पाटील, यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ता पाटील, माजी मंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांनी या तालुक्याचे नेतृत्व केले आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून उरण तालुक्यातील गावोगावी शेकापक्षाची ताकद आहे. मात्र, दरम्यानच्या काळात ही ताकद गेल्या दहा वर्षांत कमी होऊ लागली होती. अनेकांनी तर भाजपा व शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष खिळखिळा झाला होता. मात्र, शेकापक्षाला नवसंजीवनी आणण्यासाठी उरण विधानसभा निवडणुकीतून शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांनी विधानसभेची उमेदवारी लढविली. आणि या निवडणुकीत शेकापची ताकद दाखवून, त्यांनी या निवडणुकीत तब्बल 90 हजार मतांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळवून दिली आहे.

2024 च्या निवडणुकीत उरण मतदारसंघात शेकापक्षाला मिळालेली आत्तापर्यंतची सर्वाधिक मते आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुका माजी आमदार विवेक पाटील यांनी लढविल्या. त्यात त्यांचा दोन्ही वेळा पराभव झाला. मात्र, 2024 ची निवडणूक पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी लढविली. त्यांच्या उमेदवारीमुळे मरगळ आलेला व दुसर्‍या पक्षाच्या वळचणीला गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात येणे पसंत केले.

Exit mobile version