पुलाचे उदघाटन तातडीने करा; ग्रामस्थांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
उल्हासनदीवर शेलू गावाजवळ मोठा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधला जात आहे. दीडशे मीटर लांब असलेल्या या पुलाचे काम सर्व पूर्ण झाले आहे. कोणीही वाहतूक करू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला जोडकाम शिल्कक ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या पुलाचे उदघाटन लवकर करावे अशी मागणी स्थानिक वाहनचालक आणि प्रवासी करीत आहेत.
मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातून उल्हासनदीच्या पलीकडे असलेल्या गावांमधील रहिवाशी नोकरदार यांना जाण्यासाठी तेथे उल्हास नदीवर पूल नसल्याने नेरळ येथे रेल्वे मधून उतरून पुढे जावे लागते. त्यामुळे त्या भागातील जनतेची शेलू जवळ उल्हासनदीवर पूल व्हावा अशी मागणी होती. स्थानिक शेलू बांधिवली तसेच बिरडोळे,अवसरे, निकोप, मोहाली, मानिवली आदी भागातील स्थानिकांनी एकत्र येत लोकसहभागातून लहान पुलाची आहे. त्या पुलासाठी दिवंगत जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांचे मोठे योगदान होते. तर स्थानिक अभियंता तरुण एकनाथ दुर्गे यांनी बांधकाम कोणताही मोबदला न घेता केले होते. लोक वर्गणी काढून लोकसहभाग यातून दोन वर्षाच्या मेहनती नंतर पुलाची निर्मिती झाली असून त्या लहान पुलावरून पावसाळ्यात महापूर वगळता अन्य दिवस वाहतूक सुरु असते.
या भागात मंत्री दीपक केसरकर हे कार्यक्रमासाठी आलेले असताना त्यांच्याकडे नवीन पुलाचे साकडे स्थानिकांनी घातले होते. त्यानंतर राज्य सरकारने पूल बांधण्याचे काम मंजूर केले होते. तब्बल दीडशे मीटर लांबीचा हा पूल बांधकाम करण्यासाठी साडे चार कोटींचा निधी शासनाने दिला होता. आता हा पूल बांधून पूर्ण झाला असून रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे. शेलू गावातून कल्याण कर्जत रस्त्याला हा पुलावरून होणारी वाहतूक मिळणार आहे. त्यामुले हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावी मागणी आता या भागातील ग्रामस्थ करू लागले आहेत. या पुलामुळे परिसराचा विकास देखील होण्यास मदत होणार असून शेलू रेल्वे स्थानकातुन प्रवास करणारी प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.