| आगरदांडा | प्रतिनिधी |
एल निनोच्या प्रभावामुळे देशभरासह महाराष्ट्रातीलही अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने तेथील अनेक मेंढपाळांनी यंदा लवकरच कोकणाची वाट धरली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी चारा आणि कुटुंबियांसाठी अन्नधान्यांची वानवा निर्माण झाली आहे. त्यामुळे उदर निर्वाह करण्यासाठी घाटमाथ्यावरील मेंढपाळांनी आता हिरवाईने नटलेल्या कोकणाकडे आपला मोर्चा वळवला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरुन प्रवास करताना या मेंढ्याचे शिस्तबद्ध रीतीने चालणारे कळप दृष्टीस पडत आहेत.
घाटमाथ्यावरील पुणे, सातारा, भोर, लोणंद इत्यादी भागांतील मेंढपाळ आपल्या शेकडो मेंढ्या, बाकऱ्या, घोडे, कुत्रे आणि कोंबड्यांसह आपापल्या कुटुंबियांना सोबत घेऊन कोकणाकडे कुच करीत आहेत. शेतजमीनीच्या मालकाशी बोलणी करून धान्य अथवा रोख रकमेच्या मोबदल्यात हे मेंढपाळ त्या शेतकऱ्याच्या शेतात आपले तंबू ठोकून तेथेच आपली मेंढरे आणि बकऱ्यांना रात्रभर बसवतात. त्यांच्या मलमुत्राचा फायदा शेतकऱ्यांना नैसर्गिक सेंद्रिय खतासारखा होतो. परिणामी शेतीच्या उत्पादनात वाढ होते. म्हणून कोकणातील शेतकरी देखील त्यांची उत्सुकतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा कोकणातही पावसाने फारशी हजेरी न लावल्याने सप्टेंबर, ऑक्टोबर महिने कोरडे गेल्याने भातपीक धोक्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती अद्याप कापली नसल्याने, तसेच कित्येकांनी आपली शेतजमीनी ओसाड टाकली असून, पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत असल्याने या मेंढपाळांचे यावर्षी काय होणार, असा प्रश्न त्यांच्यासह शेतकऱ्यांना पडला आहे.
मेंढपाळांनी धरला कोकणचा रस्ता
