पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
राज्यातील दुष्काळी व निमदुष्काळी भागातील मेंढपाळ, विशेषतः धनगर समाज, पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी आपल्या कुटुंबासह आणि शेळ्या-मेंढ्यांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यात दाखल होतो. मात्र, रणरणता उष्मा, पाण्याची टंचाई आणि अवकाळी पावसाचा फटक्यामुळे या मेंढपाळांची मोठी वाताहत होते. आता पावसाळा जवळ येत असल्याने या मेंढपाळांना आपल्या मूळ गावी परतण्याचे वेध लागले असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाली-सुधागड व जिल्ह्यातील अनेक भागात मेंढपाळ स्थिरावले होते.
मेंढपाळ घोडे किंवा खच्चरावर आपला लवाजमा, राखणदार कुत्रा आणि मेंढ्या घेऊन रायगडच्या माळरानावर दाखल होतात. कडक उन्हात उघड्यावर कापडी तंबू ठोकून त्यांचा संसार थाटला जातो. रायगडमध्ये पावसाळी भातशेती कापल्यानंतर जमीन पडीक असते, अशा जागी हे मेंढपाळ मुक्काम करतात. या बदल्यात मेंढ्यांच्या लेंडीपासून जमिनीला नैसर्गिक खत मिळत असल्याने शेतकरीही त्यांना आनंदाने जागा देतात. मात्र, हा प्रवास दिसतो तितका सोपा नाही. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता दिवस-रात्र मेंढ्यांच्या कळपात राहून त्यांना हा व्यवसाय करावा लागत आहे.
सततच्या स्थलांतरामुळे मेंढपाळांच्या मुलांना शाळा गाठता येत नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात भटकंती होत असल्याने या मुलांचे ज्ञानकण गिरवण्याचे वय मेंढ्या राखण्यातच जाते. रणरणत्या उन्हात भटकंती करताना शुद्ध पाणी आणि सकस अन्न मिळत नाही. स्थानिक सरकारी दवाखान्यांवरच त्यांना अवलंबून राहावे लागते. दूरवर असल्याने मदतीला नातेवाईकही धावून येऊ शकत नाहीत. हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने चालतो. त्यामुळे मेंढ्यांचा विमा उतरवला जात नाही. रोगराई किंवा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मेंढी दगावल्यास मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान होते.
शहरीकरणाचा फास
जिल्ह्यात वाढत चाललेले औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे कृषी क्षेत्र आणि गायरान जमिनी कमी होत आहेत. परिणामी, मेंढपाळांना चारा आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जागाच उरली नाही तर मेंढ्या चरायच्या कुठे? असा प्रश्न आता या मेंढपाळांसमोर उभा ठाकला आहे.







