| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
शिहू-बेणसे विभागातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, वीज वितरण विभागाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी अचानक वीज गायब होत असल्याने संपूर्ण विभाग अंधाराच्या विळख्यात सापडत आहे. परिणामी विद्यार्थी, रुग्ण, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
शिहू-बेणसे परिसरातील वीज समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका” असा संतप्त इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे अजून मुसळधार पाऊस सुरू ही झालेला नसताना वीज वितरण विभागाचा गलथान कारभार समोर येत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी वीज गायब होताच डास-मच्छरांचा अक्षरशः कहर सुरू होतो. उकाडा, अंधार आणि मच्छरांच्या उपद्रवामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. लहान मुले रात्रभर रडत असून, वृद्ध व आजारी नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. सर्प, विंचू आणि इतर किटकांची भीती असल्याने अंधारात घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.
स्थानिकांच्या मते, वीज बत्ती गुल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकारी “नॉट रिचेबल” होत असून, समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेचा संयम आता सुटू लागला आहे. “वीजपुरवठा सुरळीत नसतानाही विजबिले मात्र भरमसाठ येतात, आणि बिल भरण्यास उशीर झाला तर तात्काळ कारवाई होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
शिहू-बेणसे विभाग अंधारात
